विटा - सुळकाई देवी डोंगर - रेवणसिद्ध

सदरचा ब्लॉग आमचे मित्र गुरुवर्य श्री अभय मगदूम यांनी लिहिलेला आहे. 🙏

काल संध्याकाळी किरण, वैभव व अभिची भेट झाली आणी आज विटा-रेवणसिद्धचा ट्रेक करायचा अचानक बेत ठरला.

"अनपेक्षितपणे ठरलेल्या गोष्टी जास्त आनंद देऊन जातात" 💓

पहाटे पाचला भिलवडीतून निघून सहापर्यंत विट्यात पोहोचलो. तिथे वैभवचे पाहुणे ( श्री प्रवीण दाते ) त्यांच्या माँर्निंग वाँकच्या ग्रुपने आम्हांला ट्रेकच्या पहिल्या टप्प्यात (विटा ते सुळकाई डोंगर) सोबत येत गाईड केलं. त्यांच्याशी बोलताना प्रत्येकाची काही ना काही ओळख निघालीच शिवाय आजूबाजूच्या परिसराची माहितीही मिळाली. सुळकाई डोंगरावर पोहोचताच तिथल्या टेबल टाँपवरून चहूबाजूंनी दिसणारी डोंगररांग, दरी, पठार, तलाव, झाडाझुडुपांमध्ये डोकावणारी हिरवळ पाहून दिल बागबान हो गया. ❤💓💖

देवीच्या दर्शनानंतर लोकल ग्रुपने निरोप घेतला आणी तिथून आमचा ट्रेकिंगचा दुसरा टप्पा सुरू झाला. सुळकाई मंदिरापासून रेवणसिद्ध मंदिरापर्यंतचा शेतातून जाणारा रस्ता म्हणजे जन्नतका सफर. 🏃‍♂️


नागमोडी रस्ता, शेतात डोलणारी हिरवीगार पिकं, सीताफळं, चारोळी, बिबा अशी अनेकविध झाडं,  पिवळ्याधमक सूर्यफूलापासून ते लाल-जांभळ्या घाणेरीच्या फुलांची रंगीबेरंगी पखरण, गवतात चरणारे बैल, पक्षांचा किलबिलाट, सरपटणारे सरीसृप आणी सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारे सुर्याचे सोनेरी कवडसे. सोबतीला अखंड गप्पा. शाळासोबतींचे लहानपणीचे निरागस किस्से ते दिल-दोस्ती-दुनियादारीची ह्रदयाच्या कोपर्यात जपून ठेवलेली गोड-गुलाबी हळव्या क्षणांची मखमली मोरपीसं नकळत बाहेर येत गेली. 

पावलं पायाखालचा रस्ता तुडवत होती पण मन मात्र 'लोकल ते ग्लोबल' असं विश्वव्यापी संचार करत होतं.

तासाभरानं आम्ही रेवणसिद्ध मंदिरात पोहोचलो. देवदर्शन करून देवस्थान समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली. वैभव व निलेशनं पावन परिसरातील पवित्र मातीही डबीत भरुन घेतली. थोडा वेळ थांबून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत एका ठिकाणी चहा घेतला. ☕️ नंतर रेवणसिद्धच्या मूळ मंदिराचंही दर्शन घेतलं आणी पुन्हा सुळकाई डोंगर चढून उतरून तळाशी पार्क केलेल्या कारपर्यंत आलो.  तिथून विट्याच्या मुख्य चौकात अभिचा मित्र भेटला व त्यानं आम्हांला शहरातल्या उत्तम हाँटेलात नेऊन नाश्ता दिला. नंतर त्याचा निरोप घेऊन बारापर्यंत भिलवडीत पोहोचलो.  एकूण साधारण १७ किलोमीटर चालत, डोंगर-दरी, तलाव, शेतं अशी निसर्गाची अनेक रूपं पहात पूर्ण केलेला हा ट्रेक खरंच अविस्मरणीय झाला.🏆
विटा - सुळकाई देवी डोंगर - रेवणसिद्ध विटा - सुळकाई देवी डोंगर - रेवणसिद्ध Reviewed by Vaibhav Kavade on Saturday, August 28, 2021 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.