माई!

अंदाजे तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची घटना.

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे माईंच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माईंच्या कार्याची ओळख नुकतीच महाराष्ट्राला होत होती.

व्याख्यानाचा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी चार वाजता आयोजित केलेला होता. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे माई साधारणपणे दोन तीन वाजता भिलवडी मध्ये येऊन  व्याख्यान देऊन परत जाणार होत्या.

त्यावेळी आम्ही किणीकर वाड्यात वरच्या मजल्यावर राहत. शनिवार असल्याने पप्पा व आम्ही सकाळीच शाळेत गेलो होतो.

अचानकपणे माईंच्या त्यादिवशीच्या कार्यक्रमात थोडा बदल झाला आणि त्या भिलवडी मध्ये सकाळी 10 वाजताच आपल्या घरी आल्या. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा दीपक ही बरोबर होता. त्यावेळी संवादाचं कोणतंही माध्यम उपलब्ध नव्हतं त्यामुळे पूर्व कल्पना देणं शक्य नव्हतं.

घरी कोणीही नसल्याने आईची थोडी धांदल झाली. माईं आल्याआल्या माझ्या आईला बोलल्या की मला प्रचंड भूक लागली आहे जेवायला काहीतर कर. आईने सगळ्यात प्रथम शाळेत माई घरी आल्याचा निरोप पाठवला आणि ताबडतोब स्वयंपाकाला सुरुवात केली.

माईंनी स्वयंपाक घराचा ताबा घेतला आणि आईला बाजूला केलं. त्यांनी स्वतःहून भाकरी करायला सुरुवात केल्या. माईने स्वयंपाक घरात स्वतः गाणी गात माझ्या आई सोबत भाकरी केल्या. स्वयंपाक तयार होईपर्यंत बारा वाजले होते. तोपर्यंत पप्पा व आम्ही घरी आलो.

त्यादिवशी माईंनी भाकरी व वांग्याची भाजी आवडीने खाल्ली. कृष्णाकाठची वांगी त्यांना प्रचंड आवडली.

जेवण झाल्यानंतर त्यांनी दोन-तीन तासांची विश्रांती घेऊन त्या सार्वजनिक वाचनालयात व्याख्यानासाठी गेल्या. व्याख्यान झाल्यानंतर त्याकाळी भिलवडीकरांनी त्यांना उस्फुर्तपणे सुमारे साडेचार हजार रुपयांची मदत केली.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. त्यावेळी मी सहावी/ सातवी मध्ये होतो. माईचा प्रेमळ मायेचा शब्द, आपुलकी आम्ही अनुभवली. त्यांचा आशीर्वाद पप्पा, आई, गौरी व मला मिळाला.

30 सप्टेंबर 2017 - 

दसऱ्याच्या दिवशी माईंच्या मांजरी येथील अनाथ आश्रमाला माझ्या मुलांना सोबत घेऊन गेलो होतो. निमित्त होते वरद च्या पहिल्या वाढदिवसाचे.

आश्रमामध्ये गेल्यानंतर काव्या वरदला संपूर्ण आश्रम  दाखवला आणि त्यांना वेदनेची जाणीव करून दिली. वरदच्या वाढदिवसाचे पैसे आश्रमासाठी दिले.

तेथील सेवकांची  भेट घेऊन आम्ही आश्रमा मधून बाहेर पडत होतो, तेवढ्यात एका सेवकाने आम्हाला पुन्हा बोलावून घेतले. त्यांनी सांगितले माई बाहेरून आत्ताच आल्या आहेत तुमच्या मुलांना तुम्ही भेटवू शकता.

मी, मयुरी व काव्या वरद भेटण्यासाठी दुसऱ्या/ तिसऱ्या मजल्यावरती गेलो. काव्या - वरदला माईंनी अतिशय प्रेमाने जवळ घेतले. साधारणपणे पाच ते दहा मिनिटं माईंचा सहवास आम्हा सगळ्यांना लाभला.

माझे पप्पा, आई, मी, मयुरी, व माझ्या दोन्ही मुलांना ( काव्या, वरद ) आम्हा सगळ्यांना माईंचा आशीर्वाद मिळाला. मी लहान असताना व माझी मुलं लहान असताना त्यांचे आशीर्वाद मिळाले. खरंच भाग्यवान आहोत! 

त्यादिवशी माईंनी जीवनाचा मंत्र सांगितला.

" बाळा, आयुष्याच्या रस्त्यावर कितीही खाच-खळगे, काटे असू देत, आपण त्यांना सामोरे जात चालत राहायचं असतं मगच आयुष्य फुलतं "


माई, तुमचे आशीर्वाद व समाजकार्य येणाऱ्या भावी पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏






माई! माई! Reviewed by Vaibhav Kavade on Wednesday, January 05, 2022 Rating: 5

6 comments:

Powered by Blogger.