भीती घालवणारा- कुतूहल वाढवणारा: राजगड | Rajgad Fort Trekking | चालत रहा

"सर्वाधिक आणि सातत्यपूर्ण चांगला परिणाम हा तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्या अवतीभवती परिस्थिती अनिश्चित असते"

मागील दोन-चार आठवड्यापासून आम्ही राजगड ट्रेकिंगच नियोजन करत होतो मात्र प्रत्येक वेळी काही ना काही अडचणीमुळे प्लॅन कॅन्सल होत होता.

यावेळी मात्र राजगड ट्रेकिंगचा प्लॅन शनिवारी रात्री आठच्या पुढे ठरवला. काहीही होऊ दे यावेळी मात्र राजगडचा ट्रेक करायचाच हे मनोमन  पक्क ठरवलं. रात्री उशिरा प्रवीणचाही मेसेज आला " I am coming Anna" शेवटच्या क्षणाला दीपकला सुद्धा आम्ही तयार केल आणि रविवारी पहाटे साडेपाच वाजता आम्ही राजगडच्या दिशेने निघालो.

साधारणपणे तासाभराच्या प्रवासानंतर राजगड आमच्या दृष्टिक्षेपात येत होता.आणखी जवळ पोहोचू तसं मनात धडकी बसत होती. एवढा मोठा ट्रेक आपल्याला जमेल काय? अशी मनात भीती निर्माण झाली.

"कोणतीही गोष्ट करायची ठरवली की मनात पहिल्यांदा तयार होते ती भीती"

गडाच्या पायथ्याशी पोहोचताच असंख्य लोक दिसले आणि जीवात जीव आला. 

साधारणपणे सात वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. 2006 रोजी मी पहिल्यांदा राजगड चा ट्रेक केला होता. त्या वेळच्या माझ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ट्रेक करत असताना आम्हाला भरपूर जण भेटत होते. प्रत्येक जण आपापल्या ओळखी पाळखी काढत हळूहळू पुढे जात होते. काही वेळाने मात्र मनातील भीतीची जागा आता कुतूहल ने घेतली होती. आता पुढे काय असणार?  पुढे काय बघायला मिळेल? अशी उत्कंठा मनात ताणली जात होती.

"एकदा का मनातील भीती कमी झाली की त्याची जागा कुतूहल घेते आणि हेच कुतूहल पुढचा मार्ग दाखवते" 

राजगड चा ट्रेक हा अवघड, जोखमीचा आणि कस बघणार आहे. किल्ल्याच्या चोर दरवाजापर्यंत पोहोचण्यास साधारणपणे आम्हाला तीन ते साडेतीन तास लागले.


चोर दरवाजाजवळ पोहोचतात आम्ही दरवाजाच्या उंबऱ्यावर  फुले वाहिली. सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांना वंदन करून आम्ही राजगडावरती नमस्कार करून प्रवेश केला.

गड मोठा असल्याने पहिल्यांदा गड फिरून पहायचे ठरवले. आणी आम्ही सुळेवा माची व संजीवनी माची पाहण्यासाठी निघालो. माचीकडे जाण्यासाठी पुन्हा साधारणपणे दीड ते दोन किलोमीटरचा अवघड असा ट्रेक आहे.



संजीवनी माचीचा नजारा पाहताच मनात धडकीच बसली. आजूबाजूचा सह्याद्रीचा मावळ प्रांत पाहताना जीवनात काहीही अशक्य नाही याची पुन्हा एकदा जाणीव झाली.



गप्पागोष्टी करत, जुन्या आठवणींमध्ये रममान होत, महाराजांच्या इतिहासाचा मागवा घेत घेत आम्ही गड पहात व समजावून घेत होतो. गडा बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. खरं सांगू का, गड ही आमच्याबरोबर बोलतच होता. काही ना काही तरी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होता.

दरम्यान मित्र प्रवीण ने अफलातून फोटोग्राफी करत गडाचे अत्यंत देखणे आणि सुंदर छायाचित्रण केले.
जवळपास तीन चार तासाच्या ट्रेक नंतर संजीवनीमाची पाहून झाली. प्रचंड थकवा सुद्धा आला होता. गडाचा राहिलेला भाग जसं की बाले किल्ला व इतर गोष्टी नंतरच्या ट्रेकमध्ये  पाहण्याचे ठरवले. राजगड एका दिवसात पाहून होतच नाही जवळपास तीन ते चार दिवस लागतात. आम्ही तिघांनीही पुढील काळात अजून एक राजगडचा ट्रेक करण्याचे ठरवून ठेवले.

पद्मावती मंदिरात मनोभावे नमस्कार केला. हार फुले व नारळ देवीला अर्पण केला. आयुष्यात भरपूर  ट्रेक करण्यासाठी ची ताकद आम्हाला मिळू दे असं मागणं मागितलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो.

परतीच्या प्रवासात मागे वळून पाहताना राजगड आम्हाला आशीर्वाद देत होता. गड उतरत असताना  आता पुढील आठवड्यात काय काय काय नियोजन करायचं आहे याची आखणी केली. नियोजन मार्गी लावण्यासाठीचे आराखडे मनोमन बांधून ठेवले.

"मनातील कुतुहल हे नेहमी आपले पुढील ध्येय गाठण्यासाठी मदत करते. कुतूहल हीच गोष्ट आहे की जी आपल्याला स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग  करण्यासाठी मदत करते व दिशा दाखवते."

 ब्रेक संपत असताना मात्र प्रचंड भूक लागली, आपसुकस जेवणाच्या नियोजनाचा बेत चालू झाला. सर्वानुमते गडाच्या पायथ्याला जेवण करण्याचे ठरवले.

गडाच्या पायथ्याला पोहताच काही अनोळखी लोक आमच्या जवळ आले आणि म्हणाले की आम्हाला एक तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.

" भीती गेली की कुतूहल..... कुतूहल निर्माण झालं की आराखडे ...... मग नशिबाची साथही मिळतेच "

योगायोगाने आमचा फोटो काढणारे हे स्थानिक पत्रकार होते. हा  आमचा फोटो पुण्यातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून आला. एक प्रकारे  महाराजांचा आशीर्वादच  🙏

अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या ट्रेकचं हे आम्हाला फळच मिळाल. 

मस्त जेवण करून व थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा सोसायटीच्या दिशेने निघालो. वाटेत प्रवीणने खुश होऊन मस्त चहा पाजला. अत्यंत आनंददायी व प्रफुल्लित मनाने आमचा ट्रेक संपन्न झाला.

राजगड ने मला काय शिकवले?

1- भीती नाहीशी करा.

2- सातत्यपूर्ण परिणाम हा अनिश्चिततेच्या वातावरणातच मिळतो. त्यामुळे अनिश्चिततेला घाबरू नका.

3- मनात कुतूहल निर्माण होणे हे यशाचे लक्षण आहे.

4- योजना आराखडे बांधत चला योग्यवेळी ते  एक्झिक्युट होतात आणी चांगला परिणाम देतात.

 चालत रहा ....
 व्यायाम - प्रेरणा आणि जीवन 

भीती घालवणारा- कुतूहल वाढवणारा: राजगड | Rajgad Fort Trekking | चालत रहा भीती घालवणारा- कुतूहल वाढवणारा: राजगड  | Rajgad Fort Trekking | चालत रहा Reviewed by Vaibhav Kavade on Friday, December 16, 2022 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.