ध्येयासाठी लागणाऱ्या वचनबद्धतेची शिकवण देणारा "तोरणा" | Torana Fort Trekking

ज्ञान हे जर अनुभवाच्या जोरावर मिळालेले नसेल तर मन हे चुकीच्या व भ्रामक कल्पनांनी भरून जाते. - सद्गगुरु

14 जानेवारी 2023 ला केलेला तोरणा गडाचा  ट्रेक आम्हाला खूप काही शिकवून व अनुभव देऊन गेला. ✅️

राजगडचा ट्रेक करताना आम्हाला तोरणा गड खुणावत होता. त्यामुळे राजगड नंतर आम्ही तोरणा गड ट्रेकिंग करायचं ठरवले होते.😊♥️

पहाटे साधारणपणे  साडेपाच वाजता तोरणागडच्या दिशेने आम्ही निघालो. यावेळी मात्र रस्ता परिचयाचा झाला होता. वेल्हा मार्गे करावयाचा ट्रेक किल्ल्यावरील दुरुस्ती मुळे बंद होता. त्यामुळे आम्ही कोकण दरवाजा मार्गे चढाई करण्याचे ठरवले.

या गडावर तोरण जातीचे वृक्ष भरपूर प्रमाणात असल्यामुळे या गडाला तोरणा असे नाव पडले आहे. तर महाराजांनी या गडाचा मोठा असा विस्तार बघून प्रचंडगड असे नाव ठेवले होते. तोरणा गड चा ट्रेक हा मध्यम व गिरीदुर्ग प्रकारातील असल्याने चढाई करण्यासाठी थोडासा अवघड असा आहे. ⚠️

साधारणपणे सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही गडावर जाण्यास निघालो. सुरुवातीच्या अर्ध्या तासांमध्येच आम्ही घामाघुन झालो. प्रचंड थकवा जाणवला. जवळपास 50-60% % ट्रेक हा हिल टॉप  म्हणजेच जवळपास खड्या चढाईतला आहे.🏃‍♂️🧗‍♂️

कोकण दरवाजा जवळ पोहोचण्यासाठी आम्हाला साधारणपणे दोन अडीच तास लागले आणि इथूनच खऱ्या अर्थाने आमचा ट्रेक सुरू झाला.

 " गोष्ट कितीही सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात ती करायला खूप अवघड असते " याचा पुरेपूर अनुभव आम्ही तोरणागडावरती घेतला.

कोकण दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर माझ्याजवळ मयूर नावाचा लहान मुलगा आला आणि बोलला " काका ! मी तुम्हाला गड सगळा फिरून दाखवतो. " 🙏

तो लहान मुलगा कदाचित महाराजांनीच आमच्या संरक्षणासाठी पाठवला होता.  मयूर बरोबर आम्ही किल्ला पाहत होतो. मेंगाई देवीचे मंदिर, पाण्याचे टाके, कोकण दरवाजा  पाहिल्यानंतर आम्ही झुंजार माचीकडे निघालो.

झुंजार माचीकडे जाताना  एक अवघड अशी चढाई आहे. तिथे गेल्यानंतर मात्र आमचे पुढे जाण्यास धाडस होईना. कदाचित वाढत्या वयाचा परिणाम. दुरूनच झुंजार माचीचे फोटो काढले

झुंजार माची जवळून पाहता न आल्याने आता मात्र संपूर्ण किल्ला बघून काढायचा असा विचार मनात पक्का केला आणि इथेच आम्हाला रानभुल पडली आणी पुढे एक जबरदस्त निसर्गाचा चकवा अनुभवला.

साधारणपणे तीन वाजेपर्यंत आम्ही किल्ला बघत होतो. नको त्या ठिकाणी विनाकारण जात होतो एक प्रकारची शुद्ध हरपली कदाचित त्याला कारण असू शकेल मकर संक्रांत.

ठीक चार वाजल्यानंतर आम्ही बुधला माची बघायचा निर्णय घेतला. वातावरणातील बदलामुळे आम्हाला वेळ समजत नव्हती,  कोणत्याही प्रकारचे भान नव्हते आणि स्वतःचे अस्तित्व गमावल्यासारखा प्रकार झाला होता. 

किल्ल्यावर  जिकडे वाट दिसेल तिकडे आम्ही जात होतो. कोणतीतरी निगेटिव्ह एनर्जी आम्हाला खेचून घेत आहे असा भास होत होता. बुधला माची जवळ असणारा सुळका आम्हाला सारखं  खेचून घेत असल्याचा भास होत होता.

बुधला माचीवर आम्ही अतिशय खडतर अशा वाटेने पोहोचलो त्या वाटेवरून जाताना आम्हाला एकदाही जाणीव झाली नाही की परत फिरावं. का?

बुधला माचीवर पोहोचल्यानंतर ही मन भरले नव्हते. माचीच्या पलीकडे जाऊन काय आहे ते पाहण्याचं मन होत होतं. विनाकारण.......

बुधला माचीवर पोहोचलो त्यावेळी साधारणपणे पाच वाजले होते. त्या सुनसान अश्या माचीवर फक्त आम्ही चौघेच होतो. माचीवरून परत येताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि सरळ त्या सुळक्याच्या बुडाखाली जाऊन थांबलो. तो लहान मुलगा मयूर आमच्याबरोबरच होता. तोही अचानक गांगरला. त्यालाही रस्ता नेमका समजेना. वर पाहिले तर प्रचंड मोठा सुळका आणि त्याचा खाली आम्ही चौघेच.

झाडाझुडपातुन कशीबशी वाट काढत आम्ही पुढे आलो आणि पुढे प्रचंड असा दगडाचा उतार.

सुळक्याच्या बुडाखाली पोहोचल्यानंतर मात्र आम्हाला वेळेचं भान झालं. आम्ही शुद्धी वरती आलो. घरची आठवण झाली. आपण इथे किल्ला बघायला आलो होतो मग इथे का आलो होतो? 

सकाळपासून ची प्रत्येक वेळ आठवत गेली आणि आम्ही पटकन भानावरती आलो. बुधला माचीवरून लांबून सुळका बघताना प्रवीण बोलला होता. अण्णा ! समोर सुळक्यामध्ये महाराजांची प्रतिमा दिसते. अवघ्या दोन सेकंदा नंतर पुन्हा बोलला नाही नाही हनुमानाची प्रतिमा दिसतेय. त्या सुळक्याच्या बुडाशी आल्यानंतर मला प्रवीण चे मला हे वाक्य आठवले आणि माझ्या लक्षात आले की आपण  सर्वजण भ्रमित झालो आहोत.

त्या दगडी उतारावरून उतरताना माझ्या पायामध्ये दोन ते तीन वेळा वाई आली. प्रवीणचे तर धाडसच होईना आणि संदीप तर अक्षरशः पडता पडता वाचला.

मी कसा बसा त्या दगडी उतारावरून खाली उतरत मूळ वाटे जवळ आलो. संदीप मधेच अडकून पडला होता. ना त्याला वर जाता येत होतं ना खाली उतरता येत होते. मयूर ने कसाबसा संदीपला पुन्हा वरती आणला आणि जुनी वाट शोधत शोधत ते सुखरूप खाली आले.

दरम्यानच्या काळात आमच्या तिघांच्या बीपीच काय झालं होतं ते विचारू नका 😄

साधारणपणे गड उतरायला संध्याकाळचे सात वाजले. गड उतरताना समोर सुंदर असा राजगड मनाला भावत होता.

वेडेपणा आणि आत्मविश्वास एकाच वेळी न बाळगण्याचा धडाच आम्हाला तोरणा गडाने दिला👍

गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर गडाला मनःपूर्वक नमस्कार केला. मागणं मागितलं. दहा ते पंधरा मिनिटं शांत बसलो.

आजच्या ट्रेक मध्ये असे अनुभव का आले असावेत? पाच दहा मिनिटं मला काही सुचत नव्हतं. सूर्य मावळतीला जात होता. अंग पूर्ण मातीने माखलेलं होतं. मावळती सूर्याची किरण  माझ्या हातावर पडत होती. हातावरील माती आता सोनेरी दिसत होती. मी विचारात होतो. हातावरील त्या सोनेरी मातीला न्याहाळत असताना लक्षात आलं, आज आपल्यामध्ये समतोल साधला गेला. 👍 👍👍🏃 पुढील प्रतापगड ट्रेक साठी.

तोरणा गडाने मला काय शिकवले ?

1- निसर्ग हा कायम समतोल राखून असतो.

जेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो त्यावेळी आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. आनंद हे पॉझिटिव्ह एनर्जीचे तर अश्रू हे निगेटिव्ह एनर्जीचे प्रतीक आहे.

आनंदी काळात आपल्या शरीरात जास्त झालेल्या पॉझिटिव्ह एनर्जीवर समतोल ठेवण्यासाठी निसर्गच आपल्या डोळ्यातून अश्रू आणतो आणि दोन एनर्जी मध्ये समतोल साधला जातो.

राजगड चा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आमच्यात  आत्मविश्वास आला होता. बऱ्याच पेपरमध्ये आमचे फोटो छापून आले. माझा ब्लॉग सुद्धा छापून आला. आमच्या सर्वांच्या शरीरामध्ये  मध्ये जास्त पॉझिटिव्ह एनर्जी झाली होती. जास्त झालेली पॉझिटिव्ह एनर्जी आज तोरणा गडाने आमच्याकडून काढून घेतली आणि आम्हाला समतोल केलं...पुढील ट्रेक करण्यासाठी 🏃🏃🏃

2 -  ध्येयासाठी लागणारी वचनबद्धता.

राजमाता जिजाऊंनी महाराजांसमोर एक ध्येय ठेवलं. क्रूर जुलमी सत्तेवर विजय मिळवून मराठी माणसांचं स्वराज्य निर्माण करणे.

अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकलेला तोरणा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या, माँ जिजाऊ आईंच्या आणी मराठी माणसांच्या ध्येयासाठी आपण किती वचनबद्ध आहोत याचा हा किल्ला म्हणजे साक्षात पुरावाच. 

नुसती स्वतःसाठी ध्येय बाळगून उपयोग नाहीत ती ध्येय साध्य  करण्यासाठी आपण स्वतः किती वचनबद्ध आहोत?

स्वतःमध्ये समतोल कसा साध्य करायचा आणि ध्येयासाठी लागणारी वचनबद्धता कशी सिद्ध करायची याचा धडाच मला आज तोरणा गडाने दिला.

 चालत रहा 🏃
 व्यायाम प्रेरणा आणि जीवन 






 




ध्येयासाठी लागणाऱ्या वचनबद्धतेची शिकवण देणारा "तोरणा" | Torana Fort Trekking ध्येयासाठी  लागणाऱ्या  वचनबद्धतेची शिकवण देणारा "तोरणा" | Torana Fort Trekking Reviewed by Vaibhav Kavade on Monday, January 30, 2023 Rating: 5

3 comments:

  1. अप्रतिम

    ReplyDelete
  2. खूप सुंदर

    ReplyDelete
  3. मस्त. प्रत्येक चढाई मध्ये काळजी घ्या.

    ReplyDelete

Powered by Blogger.