स्वतःच्या जाणिवेची नव्याने ओळख करून देणारा "रायरेश्वर" | Raireshwar Fort Trekking | चालत रहा

आपण स्वतःला शरीर व मनापुरते मर्यादित ठेवल्याने सर्वात मोठ्या गोष्टीचा जन्म होतो ती म्हणजे भीती. आपण म्हणजे जाणीव आहोत. ती फक्त आपल्या मध्येच सापडू शकते आणि ती आपल्या आयुष्याचा साक्षीदार असते. 
- द ग्रेटेस्ट सीक्रेट पुस्तकामधून

आम्हाला आमच्या स्वतःविषयीच्या जाणिवेची नव्याने ओळख रायरेश्वरच्या ट्रेक मध्ये झाली. ट्रेकिंग करण्याविषयीचा माझा सर्वसाधारण नियम हा की - ज्यावेळी भावना निर्माण होतात आणी त्याला वाट सापडते तोच आपला ट्रेकचा दिवस.
 
शनिवारी महाशिवरात्र - रविवारी शिवजयंती असा मस्त योग जोडून आला. शुक्रवारी ठरलं, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रायरेश्वर ट्रेक !🏃


पहाटे सहाला गाडीतूनच  बोपदेव घाटातील महादेवाचे दर्शन घेऊन रायरेश्वरच्या दिशेने निघालो. माझ्या सोसायटी पासून साधारणपणे दोन तासाचा प्रवास. भोरला पोहचल्यानंतर मस्त चहा घेतला. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासानंतर समोर रायरेश्वर दिसू लागला.

रायरी गावाच्या पायथ्याला गाडी पोहोचताच एका तरुणाने गाडी थांबवण्याचा इशारा केला. तो म्हणाला  "या वृद्ध जोडप्याला रायरेश्वरला जायचं आहे तुमच्या गाडीतून सोडाल का? हे इथले माजी मुख्याध्यापक आहेत."

आम्ही त्यांना गाडीत घेतले आणि पुढे निघालो. हे वृद्ध जोडपे सांगोला तालुक्यातून महाशिवरात्री साठी रायरेश्वरला येत होते. हे त्यांचं सलग अठरावं वर्ष होतं. आम्ही आश्चर्यचकित झालो. 75 वर्षाचा म्हातारा माणूस गेली सलग अठरा वर्ष महाशिवरात्रीच्या दिवशी रायरेश्वरला येतो.

खरंतर हा आम्हाला भेटलेला प्रत्यक्ष महादेवच होता. हे ढोले मास्तर सांगोल्याचे तर मी मूळचा आटपाडीचा. त्यात दहा मिनिटांच्या प्रवासात आम्ही त्यांना नानाविध प्रकारचे प्रश्न विचारले. रायरेश्वरला सलग अठरा वर्षे येण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलेले उत्तर ऐकून आम्ही अचाट झालो.

गाडीतून उतरताना त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितले. मी तुमच्या गाडीतून येणं हा दैवी योगच होता. आजच्या महाशिवरात्रीनंतर तुम्हालाही या रायरेश्वराचा योग येणार आणि पुढच्या तुमच्या आयुष्यात तुम्हीही इथे येत राहणार. आजचा योगच आहे बघा !

पायथ्याला गाडी लावल्यानंतर साधारणपणे 300 ते 400 पायऱ्यावर चढून गेले की रायरेश्वराचे पठार सुरू होतं. पठारावरती बरीच विकास कामे झालेली आहेत रस्ते, लाईट याची उत्तम व्यवस्था आहे. पठारावरील पाने - फुले आमचे लक्ष वेधून घेत होती. इथलं प्रत्येक झाड- फुल वैशिष्ट्यपूर्ण आहे.

साडेनऊच्या आसपास आम्ही रायरेश्वरच्या मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच आम्हा तिघांना जी अनुभूती झाली ती शब्दात मांडू शकत नाही.

सुरवातीला दहा मिनिटे दर्शन घेतल्यानंतर इतका आनंद झाला होता की बाहेर जाऊच वाटत नव्हतं. आम्ही तिघांनी शिवाजी महाराजांची आरती,  महादेवाची आरती व महादेवाचा अभिषेक मंदिरात केला. अभिषेक करत असताना आमच्या अंगावर शहारे आले होते  तर डोळे ओलावले होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी व शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दोन-तीन मिनिटे नाहीतर तब्बल 30  मिनिटे आम्ही रायरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचा व महाराजांचा जयजयकार करत होतो.  यावेळी प्रत्येक सेकंदाला आम्हाला वेगळा भक्तीपूर्ण अनुभव येत होता.

महादेवाच्या व महाराजांच्या आशीर्वादाने आज आम्ही तृप्त व आनंददायी झालो.  त्या वृद्ध जोडप्याने सांगितलेला योग म्हणजे नेमका काय होता हा मंदिरामध्ये उलघडला.


रायरेश्वर वरती सर्व जंगम आडनावाचे लोक राहतात. मूळ शिवा जंगम नावाचा व्यक्ती महाराजांनी रायरेश्वराची पूजा व देखभालसाठी कर्नाटक मधून आणला होता. त्याचीच पुढे वंशावळ आज रायरेश्वराला राहते.

तेथील पुजाऱ्यांशी बोलत असताना माझा मित्र संदीप सुटी हा कर्नाटकातील आहे हे समजल्यानंतर तेथील पुजाऱ्यांना  आनंद झाला. आपल्या भागातून कोणीतरी कर्नाटक मधून आला आहे याचा त्यांना आनंद झाला. तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि रायरेश्वराचं महत्त्व समजावून सांगितलं. 

" महाराजांनी स्वराज्याची शपथ इथे घेतली आहे याचाच अर्थ रायरेश्वर हे अखंड हिंदुस्तानचे कुलदैवत आहे "



पठारावरती फिरत असताना, एका आजीने आम्हाला चक्क दानधर्म केला. तिने तिच्या घरात बोलवून आम्हाला चहा दिला. म्हणाली "बाळा आज महाशिवरात्रीच्या दिवशी दानधर्म करायचा असतो" आम्हीही सोबत आणलेली राजगिऱ्याचे लाडू आजीला खायला दिले.

साधारणपणे दोन ते तीन तासांमध्ये आम्ही रायरेश्वरचे संपूर्ण पठार पिंजून काढले. येथील पांडवकालीन लेणी, सप्तरंगी मातीचे ठिकाण हे आवर्जून पाहण्यासारखं आहे.



साधारणपणे दुपारी दोनच्या आसपास आमचा अविस्मरणीय असा रायरेश्वरचा ट्रेक समाप्त झाला.


रायरेश्वर ट्रेकने काय शिकवले ?

आपल्या नजरेसमोर असते पण कधीही लक्षात न येणारी एक गोष्ट आपल्यामध्ये असते. आणि अचानकपणे आपल्याला ती जाणवते, एक स्वतःचं रहस्य म्हणून. त्यालाच आपण म्हणतो - देव पावला. 

रायरेश्वरामुळे  आम्हाला आमच्या खऱ्या सत्वाचा शोध लागला. स्वतःविषयीच्या जाणवेचा नव्याने शोध लागला.  मी म्हणजे नेमका कोण आहे? या रहस्याचा उलघडा रायरेश्वराने आज आम्हाला करून दाखवला. 🙏

चालत रहा 🏃
व्यायाम, प्रेरणा आणि जीवन
स्वतःच्या जाणिवेची नव्याने ओळख करून देणारा "रायरेश्वर" | Raireshwar Fort Trekking | चालत रहा स्वतःच्या जाणिवेची नव्याने ओळख करून देणारा "रायरेश्वर" | Raireshwar Fort Trekking | चालत रहा Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, February 26, 2023 Rating: 5

3 comments:

  1. Very nice write up…keep walking…jee writing

    ReplyDelete
  2. खूप सुंदर अनुभव सर....स्वत्व शोधण्यासाठी रायरेश्वराच दर्शन घ्यावे अस वाटतय आता

    ReplyDelete

Powered by Blogger.