आनंदाच्या वाटा "रोहिडेश्वर" | Rohida- Vichitragad Trekking | चालत रहा

आपण सर्व म्हणजे आनंद. सध्याच्या जीवनशैलीत,  मीपणाच्या दुनियेत आणि नकारात्मक विचारसरणीमुळे हा आनंद स्वतः पासून कोसो दूर गेला आहे.

गावावरून आल्यावर शुक्रवारी दुपारी रोहिडेश्वरला जाण्याचा बेत आखला. मी आणि संदीप दोघेच तयार होतो.

रात्री प्रवीणने प्रशांतला फोन करुन विचारले, "कासव प्लॅन कुठं पर्यंत आला आहे"? प्रशांतला कासव पहायला वेळास बीचला जायचं होतं, पण बरोबर कोणी नसल्याने हिरमोड झाला होता. अश्यातच त्याने एकटा जाण्याचा बेत सुद्धा आखला होता. प्रवीणने रोहिडेश्वरचा ट्रेकचा प्लॅन सांगितला आणि रात्री 10:45 ला आम्ही सगळे ट्रेकच्या नियोजनाला लागलो.

भोरच्या पुढे बाजारवाडी या छोटयाश्या गावापासुन रोहिडेश्वरचा ट्रेक सुरु होतो.सकाळी 8 वाजता रोहिडेश्वरवर जाण्यासाठी निघालो. गडावर जाण्यासाठीची वाट ही उत्तम आणि सुरक्षित आहे.

जवळपास एक तासाचा ट्रेक करून आम्ही गडाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. या ठिकाणी फत्ते बुरुज व पाण्याचे टाके आहे. फत्ते बुरुजवरून समोर मांढरदेवीचा डोंगर आणि आसपासचा परिसर दिसतो.

थोडं पुढं चालत आल्यावर प्रवेशद्वारावरील दोन्ही बाजूला असलेल्या हत्तीच्या आकर्षक शिल्पांनी आमचे लक्ष वेधून घेतले.

या प्रवेशद्वारामधूनच आपण गडावरील मुख्य भागात प्रवेश करतो. या ठिकाणी राजसदर व राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. इथेच एक छोटे हनुमानाचे मंदिर आहे. गडावरती भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या आसपास केलेले वृक्षारोपण आणि इतर डागडुजीमुळे हा किल्ला सुस्थितीत आहे.

गडावरती सात बुरुज आहेत. हिरडस मावळ प्रांतातील स्वराज्याच्या शिलेदारांची नावे गडावरील काही बुरुजांना दिलेली आहेत.

गडावरून फिरताना मांढरदेवीचे मंदिर, तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रायरेश्वर हे किल्ले स्पष्ट दिसतात. मागील महिन्यात आम्ही हे सर्व किल्ले पाहिले होते. रोहडेश्वरावरून हे किल्ले पाहताना दुरून या किल्ल्यांवरती जाण्यासाठीच्या वाटाही दिसत होत्या. आमच्यासाठी या सगळ्या आनंदाच्या वाटा होत्या.😊

जवळपास दोन तासाच्या गडभ्रमंती नंतर भैरवनाथाच्या व गडावरून दिसणाऱ्या प्रत्येक किल्ल्याला पाया पडून आम्ही आनंदी मनाने रोहिडेश्वरचा  निरोप घेतला. 

रोहिडेश्वराची आम्हाला शिकवण - 

गडावरून  मांढरदेवी - केंजळगड - रायरेश्वर पठार - राजगड - तोरणा - सिंहगड पाहताना जो आनंद झाला नां तो अवर्णनीय. रोहडेश्वरावरून दुरून या गडांवरती जाणाऱ्या वाटा  आमच्यासाठी या आनंदाच्या वाटा.

या प्रत्येक किल्याच्या वाटेवर आम्हाला नवीन लोक भेटले. नवीन ऊर्जा मिळाली. लोकांच्या मनात डोकवण्याची संधी मिळाली. 

बुरुजांना दिलेली नावे पाहिल्यानंतर जीवनात आम्ही हा शब्द किती महत्त्वाचा आहे हे समजून येते. या किल्ल्यांच्या  वाटेवरून चालताना आमचा मीपणा धुळीला मिळाला... कायमस्वरूपी. 

जीवनातील वाट ही एकाकी नसावी. ती भरलेली असावी चांगल्या विचाराच्या लोकांनी. या गडकिल्ल्यांच्या वाटांवरती आम्हाला भेटले ते फक्त चांगल्या विचारांची उधळण करुन आनंद देणारे व एकमेकांना जोडणारी लोकं. 

आज रोहिडेश्वरचा ट्रेक पूर्ण केला. भोर परिसरातील महादेव डोंगररांग मधील सर्व किल्ले आता पाहून झाले. आज आनंदाच्या वाटा एकमेकांना जोडल्या गेल्या होत्या. 

रोहिडेश्वर उतरताना मन अचानक हलकफुलक झालं.आम्हांला मोराच्या पिसासारखं हलकं वाटत होतं. शांत वाटत होतं. 

नकारात्मक भावना, मीपणा, अहंकार, दडपण या सर्व गोष्टी महादेव डोंगररांग मधील आनंदाच्या वाटेवरून चालताना कधीच विरघळून पडल्या.

रोहिडेश्वरामुळे या सर्व वाटा आमच्या मनात आज एकत्र आल्या, नवी आनंदाची वाट दाखण्यासाठी..जोडण्यासाठी 🏃

आनंदाच्या वाटा "रोहिडेश्वर" | Rohida- Vichitragad Trekking | चालत रहा आनंदाच्या वाटा "रोहिडेश्वर" | Rohida- Vichitragad Trekking | चालत रहा Reviewed by Vaibhav Kavade on Monday, March 27, 2023 Rating: 5

2 comments:

Powered by Blogger.