सुरक्षित ट्रेकिंगसाठी....

मागील आठवड्यात वर्तमानपत्रांमधील   ट्रेकिंग दरम्यान झालेल्या अपघातांची बातमी वाचून खूपच दुःख झाले. 

आजकाल आम्ही ट्रेकिंग हा एक  इव्हेंट करण्याचा प्रकार आहे असं समजून त्याकडे पहात आहोत. प्रत्यक्षात ट्रेकिंग करणे हा एक धाडसी खेळ प्रकार आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

आम्हाला ट्रेकिंग करताना आलेल्या अनुभवांवरून  असं वाटतं की , ट्रेकिंग करताना वेळेचे भान नसणे, फोटो/ विडिओ काढण्यासाठी बुरुजांवरती उभे राहणे, स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज नसणे, गड किल्ल्यांवरती दारू पिणे, गड किल्ल्यांच्या परिसराची माहिती नसणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

मागील महिन्यात आम्ही जेव्हा तोरणा गडाचा ट्रेक केला त्यावेळी आम्ही थोडक्यात बचावलो होतो. त्यावेळी आलेल्या अनुभवावरून आम्ही शहाणे झालो आणि पुढील प्रत्येक ट्रेक करताना योग्य ती काळजी घेऊ लागलो. तोरणा गडाचा ट्रेक करताना आमचे वेळेचे भान सुटलेले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही गडावरती भटकत होतो.

अनोळखी प्रदेशात जेव्हा वेळेचे भान हरपते त्यावेळी मनात भीती दाटून येते, चलबीचलता वाढते, मेंदूंवरील विचारांचा कंट्रोल सुटतो, पाय थरथर कापतात. हा सर्व अनुभव आम्ही तोरणा ट्रेक करताना घेतला आहे.

त्यादिवशी आम्हाला घरी यायला रात्रीचे दहा वाजले. आम्ही प्रचंड घाबरून गेलो होतो. बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. दुसऱ्या दिवशी चहा प्यायला आम्ही एकत्र जमल्यानंतर चर्चा केली आणि लक्षात आलं की आपण जे ट्रेकिंग करत आहोत त्याची पद्धत - योजना अयोग्य आहे.  चर्चेअंती आमच्या टीमने ट्रेकिंगसाठी अशी खास चेकलिस्ट बनवली. कोणताही ट्रेक करण्यापूर्वी आम्ही स्वतः बनवलेली चेकलिस्ट फॉलो करू लागलो. 

तोरणा ट्रेकिंगला आलेल्या अनुभवानंतर  आम्ही  नियोजन पूर्वक असे पाच ट्रेक अत्यंत आनंदाने व समाधानाने पूर्ण केले.

आम्ही ट्रेकिंगसाठीचे नियोजन खालीलप्रकारे तीन टप्प्यात करतो. 

1 - ट्रेकिंगसाठीची पूर्वतयारी
2-  ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी
3 - ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर

1 -ट्रेकिंगसाठीची पूर्वतयारी

1- गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाताना कमीत कमी चार लोकांचा समूह  तर जास्तीत जास्त आठ लोकांचा समूह असावा. आपला समूह हा समवयस्क आणि मैत्रीपूर्ण लोकांचा  असावा. अनोळखी लोकांच्या बरोबरच्या ट्रेक मधून एकमेकांना पुरेशी मदत मिळेल याची खात्री बाळगता येत नाही. जास्त लोक बरोबर असल्यास ट्रेकिंग करताना विस्कळीतपणा येऊन एकमेकांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

परवा रायरेश्वरला दहा लोकांचा एक समूह आला होता. नऊ लोक हे 30-40 वयाचे  तर एक व्यक्ती हे 65 वयाचे होते. ते एकटेच मागे पडले  होते  आणि अचानक त्यांना त्रास सुरू झाला. योगायोगाने  आम्ही ट्रेक संपवून खाली उतरत होतो त्यावेळी आम्ही त्यांना मदत करू शकलो.

2 -  ट्रेकिंगसाठी योग्य दिवस निवडा. ट्रेकिंगसाठी शक्यतो सुट्टीचा दिवस, शनिवार, रविवार  निवडा. अश्या दिवशी गड किल्ल्यांवर गर्दी असल्याने अपघात झाल्यास ताबडतोब मदत मिळू शकते.  सुट्टीच्या दिवशी आपल्या वरती वेळेचा ताण तणाव कमी असतो. उदाहरणार्थ , ऑफिसला वेळेवर पोहोचणे, घरातील कामे, मुलांना वेळेवर शाळेत सोडणे  इत्यादी. सुट्टीच्या दिवशी ट्रेक केल्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपली अनोळखी लोकांबरोबर ओळख वाढते व आपला मित्र संग्रह वाढतो.

3 - गड किल्ल्याच्या परिसराची योग्य माहिती गोळा करा.

अनोळखी प्रदेशात जाताना त्या प्रदेशाची संपूर्ण माहिती गोळा करावी. गुगल मॅप चा वापर करून रस्त्यांची माहिती, लोकेशन्स, गडाची संपूर्ण माहिती, पाण्याची उपलब्धता याची माहिती घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे त्या भागातील हॉस्पिटल्सचे नंबर, ॲम्बुलन्सचे नंबर  आणि पोलीस स्टेशनचा नंबर ट्रेकिंग पूर्वी घ्यावेत. अडीअडचणीच्या वेळी याचा उपयोग होतो.

4 - प्राथमिक प्रथमोपचार किट 

आपल्या ट्रेकिंग करणाऱ्या समूहाकडे  प्राथमिक प्रथमोपचार किट असावा. हा किट डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्यासाठी योग्य असा  बनवून घ्यावा. शक्यतो ट्रेकिंग करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःचा प्रथमोपचार किट जवळ बाळगावा. 

5 -  ट्रेकिंग साठीचा आहार

 ट्रेकिंग करताना शारीरिक ऊर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. ट्रेकिंगसाठी सोबत हलका पण  सात्विक, उत्साहवर्धक व ऊर्जादायी आहार  सोबत असावा. आम्ही  ट्रेकिंगला आहार म्हणून खजूर, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की, फळ, इलेक्ट्रॉल पावडर, गूळ, खडीसाखर इत्यादी. पदार्थ सोबत घेतो. पोट आणि शरीर जड होईल असे पदार्थ घेऊन येत. पॅकज फूड टाळावे.

6-  वेळेचे भान राखण्यासाठी

गडावरती फिरताना वेळेचे भान राहत नाही. संध्याकाळ केव्हा होते समजून येत नाही अशावेळी आपण गडबडीत गड उतरताना अपघात होण्याची शक्यता असते.

भान राखण्यासाठी मोबाईल मध्ये एक एक तासाच्या फरकाने प्रत्येक व्यक्तीने गजर लावावा. जेणेकरून आपण गडावरती वेळेच्या बाबतीत सावध राहू.  स्वतःजवळ शिट्टी बाळगावी. अपघात प्रसंगी आपण शिट्टी वाजवून मदतीसाठी कमी श्रमात इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतो.

7- आपण कोणत्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणार आहोत याची पूर्वकल्पना आपल्या कुटुंबीयांना देऊन ठेवावी.

8- ट्रेकिंग बॅगचे वजन आपणास पेलेल एवढे असावे.

9- ट्रेकिंगसाठी योग्य आणि सुरक्षित बूट असावा. सोबत काठी व दोर असावा. 

10- ट्रेकिंग साठी शक्यतो पांढऱ्या रंगाचे व लूज कपडे असावेत. भडक रंगाच्या उग्र वासाच्या कपड्यांमुळे  मधमाशांचा त्रास होण्याची शक्यता असते.

वरील पूर्वतयारी केल्यास आपले ट्रेक हे आनंददायी व यशस्वी होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

ट्रेकिंग म्हणजे गड चढणे व उतरणे. हाच भाग म्हणजे ट्रेकिंगचा आत्मा होय.  ट्रेकिंग यशस्वी  होणे न होणे हे आपल्या तयारीवर व आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे गड चढताना व उतरताना सकारात्मक विचार अत्यंत गरजेचे असतात. ट्रेकिंग करताना स्वतःबरोबरच आपल्या समूहाची काळजी घेणे सुद्धा गरजेचे असते. गड चढताना उतरताना खालील प्रकारे काळजी घ्यावी.

2- ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी 

1 - ट्रेकिंग करताना आपली नजर ही आपल्या समोरील वाटेवरती असली पाहिजे. वाटेवरील दोन्ही बाजूचा अंदाज घेत हळूहळू चालावे.

2- संपूर्ण ट्रेक मध्ये  समान गतीमध्येच चालावे. त्यामुळे धाप लागत नाही. ट्रेकिंग करताना धावपळ, पळापळ करू नये, जोर देऊन चालू नये. या कारणांनी चक्कर येणे, धाप लागले हृदयावर ताण येणे अश्या घटनांची शक्यता असते. शक्य असेल तर स्मार्टवॉचचा वापर करावा.  ठराविक अंतरानंतर विश्रांती घेणे गरजेचे असते. समूहातील सर्वांनी एकत्रपणे चालण्याचा प्रयत्न करावा.

3 - ट्रेकिंगच्या वेळी धोकादायक ठिकाणी फोटो अथवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये.

4 - ट्रेकिंग करताना गंमत म्हणून  दगड धोंडे अथवा जड वस्तू गडाच्या उताराच्या दिशेने  फेकू नये. त्यामुळे आपल्याच सहकाऱ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

5- ट्रेकिंग करताना चक्कर येत आहे असे जाणवल्यास आहे त्या जागी बसावे. पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये.

6-  ट्रेकिंग करताना स्थानिक व्यक्ती गाईड म्हणून सोबत घ्यावी. स्थानिक व्यक्ती सोबत असल्यास  ट्रेकिंग सुरक्षित होण्यास मदत होते.

7- गड फिरताना माहिती नसलेल्या अवघड अशा जागी जाण्याचे टाळावे. अशावेळी गाईड उपयोगी पडतात.

8- गडाच्या बुरुजांवरती फिरताना काळजी घ्यावी. हवेच्या प्रचंड वेगामुळे बुरजांवरून तोल  जाण्याची शक्यता असते. बुरुजांचे दगड निखळलेले असू शकतात. अशावेळी बुरुजांवर  उभे राहून फोटो काढण्याचा प्रयत्न महागात पडू शकतो.

9 - गडांवर ऐतिहासिक मंदिरे असतात. या मंदिरांना श्रद्धेने भेट देऊन आत्मिक समाधान प्राप्त करून घ्यावे.

10- दिवस मावळण्यापूर्वी आपण गडावरून खाली उतरलेले असावे.

11- गड उतरताना दगड धोंड्यांवर पाय न ठेवता सपाट जागी पाय ठेवत सावकाश खाली उतरावे.

12- माझे मित्र ट्रेक करत आहेत,  ते जातायत म्हणून स्वतः ट्रेक करू नये. आपली स्वतःची शारीरिक व मानसिक क्षमता ओळखून ट्रेक करावा.

3 - ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर - 

1 - ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं पूर्णपणे विश्रांती घेऊन फ्रेश झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी.

2- ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर आपण या ट्रेकिंग मधून काय शिकलो याचे आत्मचिंतन करावे.

3- ट्रेकिंग करताना कोणत्या उणीवा राहिल्या हे आठवावे व पुढील ट्रेकमध्ये त्या उणीवा कशा दूर करता येतील याचे नियोजन करावे.

ट्रेकिंग करणाऱ्या सर्वांनी वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहेच त्यासोबत शासनाने सुद्धा काही खालील उपाययोजना करणे आवश्यक वाटते.

1 - गड-किल्ल्यांवरती मोफत गाईड उपलब्ध करणे.

2 - गडांवरती धोक्याच्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत.

3-  प्रत्येक गडाच्या पायथ्याला माहितीचा बोर्ड लावावा. त्या बोर्ड मध्ये परिसरातील डॉक्टरांचा नंबर, पोलीस स्टेशन चा नंबर ॲम्बुलन्स चा नंबर,  हॉटेल्स, ब्लड बँक नंबर, पत्रकार सामाजिक संस्थांचे नंबर असावेत.

4- गडाच्या पायथ्याला एखादे शासकीय विश्रांतीगृह असावे.

आपले गड किल्ले म्हणजे आपला समृद्ध वारसा आहे. हा वारसा जपणे आपल्या सर्व ट्रेकरचा  प्रथम उद्देश आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

बीपी, शुगर हृदयविकार किंवा अन्य काही शारीरिक व्याधी असल्यास, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही ट्रेक करू नये.

आरोग्यदायी व सुरक्षित ट्रेकसाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा 🌹

चालत रहा 🏃
 वैभव कवडे - प्रवीण पाटील - संदीप सुंटी - दीपक पाटील 

"चालत रहा" या आपल्या ब्लॉग मधील "सुरक्षित ट्रेकिंगसाठी" या पोस्टची दखल बातमी स्वरूपात दैनिक प्रभातने घेतली. तर पुण्य वैभव या डिजिटल वृत्तपत्राने सविस्तरपणे नुकतीच घेतली. 

चालत रहा म्हणजे  अपयशाने न खचता, न डगमगता, खचून न जाता, निसर्गाच्या सानिध्यात राहून यशाची वाट शोधणे....आणि त्या वाटेवरून न थकता, विनम्रपणे पुढे पुढे जात राहणे. 

चालत राहा या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला ट्रेकिंग दरम्यान आलेले अनुभव - शिकवण, प्रेरणादायी विचार, सामाजिक उपक्रम तसेच व्यायाम, आहार, व आर्थिक बाबींविषयी लिखाण केले जाते. 




सुरक्षित ट्रेकिंगसाठी.... सुरक्षित ट्रेकिंगसाठी.... Reviewed by Vaibhav Kavade on Friday, March 31, 2023 Rating: 5

4 comments:

  1. ट्रेकिंग च्या वेळेस आपली स्वतःची सुरक्षितता खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी ही प्रत्येकाला नम्र विनंती आपण ट्रेकिंग पूर्व योग्य नियोजन करावे. सर्वांना ट्रेकिंग साठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिला आहे. सगळे मुद्दे छान मांडलेत.

    ReplyDelete
  3. ट्रेकिंग करणाऱ्या सगळ्यांसाठी विशेषत: नवख्या व हौशी ट्रेकर्सना उपयुक्त असा माहितीयुक्त परिपूर्ण ब्लॉग 👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेख आणि ट्रेकिंग बद्दल परिपूर्ण आणि उपयुक्त माहिती या मध्ये मांडण्यात आली आहे, भविष्यात पुढे जाण्यासाठी हा लेख खूप फायदेशीर होईल, धन्यवाद आणी खूप शुभेच्छा

    ReplyDelete

Powered by Blogger.