दररोजचा माँर्निंग वाँक करताना जर आपण एकटेच असलो तर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःशीच मनन-चिंतन होत राहतं पण जर सोबतीला कुणी असेल तर माँर्निंग वाँकबरोबर माँर्निंग टाँकही होत असतं. अशावेळी विषय हे साधारणतः आरोग्य आणी जीवनशैलीशी संबंधीतच असतात. कालही असेच आम्ही बदलती जीवनशैली आणी वाढते आजार याविषयावर चर्चा करत होतो. आपल्या पूर्वजांची जीवनशैली आणी आहार-विहाराची तुलना सध्याच्या जमान्याशी होत होती. चालता चालता मित्र अभय मगदूम जैन धर्मातील आहार - विहार याविषयी माहिती सांगत होता. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी महावीर जयंती होती. भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने भिलवडीच्या जवळच असलेले जैन धर्मियांचे प्राचीन काळचे तीर्थक्षेत्र श्री झरी पार्श्वनाथ डोंगर कुंडलला ट्रेक करण्याचे ठरवले.
कुंडल हे प्राचीन काळचे कौडण्यपूर. चालुक्य इतिहासाशी संबंधित आहे. पार्श्वनाथ तीर्थकर, भगवान महावीर तीर्थकर यांनी कुंडलच्या गिरीपठारावर धर्मसभा घेतली होती. श्रीधर मुनी व अन्य महामुनींचे या ठिकाणी निर्वाण झाले. त्यामुळे जैन धर्मामध्ये हे क्षेत्र सिंधूक्षेत्र मानले जाते. या डोंगरावरती स्वयंभू वीरभद्र यांचे देवस्थान तर झरी पार्श्वनाथ, गिरी पार्श्वनाथ ही मंदिरे आहेत.
जगातील प्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या जैन धर्माच्या आहार-विहाराविषयीच्या संकल्पना या हजारो वर्षांच्या श्रमण-संस्कृतीतून आलेल्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारीत आहेत.
आहार :
जैन धर्मीय लोक अहिंसावादी असल्याने शाकाहार पसंत करतात. शाकाहार हा आरोग्यदृष्ट्या पचायला सोपा व सात्विक प्रकारात मोडतो. काही जैन लोक कांदा-लसूण व कंदमुळे ही खात नाहीत. विशेषतः पावसाळ्यातील चार महिने त्याचा त्याग करतात कारण या काळात जमिनीत आणी हवेतही अनेक सूक्ष्मजीव-जंतूंचा प्रादुर्भाव वाढलेला असतो की जे अनेक आजारांना कारणीभूत असतात.
जैन धर्मियांच्या आहारविषयक सवयीमधील आणखी एक घेण्याजोगी गोष्ट म्हणजे ते रात्रीचे जेवण हे सुर्यास्ताच्या आसपास, अंधार पडण्यापूर्वी घेतात. यामागील कारण धार्मिक असले तरी आरोग्याच्या दृष्टीनेही सुयोग्य आहे. आपल्या शरीराची पाचनशक्ती ही सकाळी उत्तम, दुपारी मध्यम व रात्री कमी होत जाते. त्यामुळे सुर्यास्ताच्या आसपास जेवणे कधीही चांगले. त्यामुळे रात्री झोपेआधीच्या अडीच-तीन तासात अन्नाचे योग्य पचन होऊन झोपही चांगली लागते.
जैन धर्मात उपवासांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. अष्टमी-चतुर्दशी, दशलक्षण-पर्व व इतर अनेक सणांना उपवास करून अध्यात्मिक लाभाबरोबरच शरीरातील पचनसंस्थेलाही आराम देऊन मनो-शारिरीक शुद्धी केली जाते. जैन मुनी-महाराज तर अनेक दिवस कडक उपवास करत असतातच शिवाय दररोजही एकच वेळ व तेही उभे राहून हाताच्या ओंजळीने आहार घेतात. यामुळे शरीराला गरजेपुरतेच अन्न मिळते.
विहार :
जैन धर्मात श्रमण संस्कृतीला महत्त्व आहे. श्रमण म्हणजे आयत्या फळाची अपेक्षा न धरता श्रम करून ते मिळवणे. मग ते श्रम शारीरिक असोत की बौद्धिक. जैन मुनी वर्षातले पावसाळ्याचे चार महिने सोडले तर इतर आठही महिने सतत भ्रमंती करत असतात. यासाठी ते कोणतेही वाहन वापरत नाहीत. मैलोनमैल, उन्हातान्हात अनवाणी चालतात. अशा खडतर वाटचालीतून मोक्षमार्गावरील त्यांचा प्रवासच त्यांना अंतिम ध्येयापर्यत पोहोचवतो.
आज भगवान महावीर जयंतीच्या दिवशी डोंगरावरती असलेल्या गिरी पार्श्वनाथ मंदिरातील प्राचीन भगवान मुर्तीच्या दर्शनाने आम्ही तृप्त झालो. मंदिरात आम्ही सर्वांनी पाच ते दहा मिनिटे ध्यानधारणा केली. मन प्रफुल्लित झालं. मनाला नवीन ऊर्जा मिळाली.
याच डोंगररांगेतील पुर्वेकडील डोंगरावर लिंगायत समाजाचे स्वयंभू वीरभद्र देवस्थान असल्याने त्याला 'वीरभद्र डोंगर' म्हणून ओळखले जाते. तेथील मंदीरात दर्शन घेऊन, गुहा वगैरे पाहून लिंगायत व जैन धर्मियांचे प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या या पवित्र डोंगरांना प्रदक्षिणा मारत आजच्या ट्रेकची सांगता केली.
भगवान महावीर जयंतीदिवशी जैन धर्माचे प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या या पवित्र डोंगरावर ट्रेकिंग करताना जैन धर्मातील आहार-विहाराविषयीच्या काही अनुकरण करण्यायोग्य बाबींचा आपल्या जीवनशैलीत समावेश करायचा असं आम्ही ठरवलं आणी इथून पुढेही जगातील सर्व धर्म-पंथ, प्रांत-देश यांमधील जे जे उदात्त, उन्नत असेल त्याचा शोध घेत-घेत पुढील जीवन-प्रवास हा असाच चालू राहील.
🌹 भगवान महावीर जयंतीच्या सर्वांनां हार्दिक शुभेच्छा 🌹
चालत रहा.
अभय मगदूम, मित्तल कोष्टी, किरण पाटील, वैभव कवडे
श्री झरी पार्श्वनाथ तीर्थक्षेत्र डोंगर कुंडल
Reviewed by Vaibhav Kavade
on
Tuesday, April 04, 2023
Rating:
No comments: