वासोट्याची बोट | The Life Philosophy of Boatman

नमस्कार मंडळी !  मी नारायण सरपंच आंबवडे शेंबडी गावचा. गावात दत्त मठ आहे. गावातल्या लोकांनी मिळून बोट क्लब चालू केला. वासोटा किल्ला बघण्यासाठी पर्यटक येतात आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमचा उदरनिर्वाह चालतो.

इथे येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही आमच्या घरातला माणूस समजतो. वासोटा बघायला येणार प्रत्येक पोर हे आमचं, तर आमची पोरं त्यांची असं समजून आम्ही त्यांची आई बहिणी प्रमाणे त्यांची सेवा करतो. आमच्या मातीची लेकरं समजून सेवा करतो आणि त्यामधून आम्हाला दोन पैसे मिळतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात  स्वतःची नौका असते. या नौकेतूनच त्याचा आयुष्याचा प्रवास सुरु असतो. नारायण रावांना त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगताना उर भरून आला होता.

माझी जीवनरूपी नौका कधीच बुडाली नाही. बोटीच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये मी  प्रत्येकाबरोबर  प्रेमाची व सहकार्याची भावना ठेवली. सेवाभाव ठेवला. नारायण सरपंच त्यांचा जीवनाचा प्रवास सांगत होते....

आयुष्य म्हणजे काय हो? प्रेम!!!!  जग बघताना - फिरताना प्रेमाची - माणुसकीची भावना ठेवली तरच जग तुम्हाला सहकार्य करेल. या गरिबाच्या घरी जेवायला येतात. आशीर्वाद देतात आणि हेच आशीर्वाद माझ्या पोरा बाळांनां मोठं करतात.

स्वतःच्या आयुष्यात दुसऱ्याविषयी  सेवाभाव, आपुलकी नसेल तर हा निसर्ग तुम्हाला काहीच मिळू देणार नाही.  लाडी - लबाडी - फसवून  मिळालेलं आयुष्यात कधीच टिकत नाही. अगदी घरावरची कौल सुद्धा. 

आयुष्याच्या तुमच्या बोटी मधून प्रवास करताना तुमचा चेहरा सांगेल, तुम्ही कसे आहात? तुमचे डोळे बोलतील तुम्ही कोण आहात? प्रेम हा आयुष्याचा गाभा आहे. या बोटीतून पुढे जात असताना प्रेम वाटत चला त्यामुळे माणसं जवळ येतील.  जगात फिरताना माणुसकी जोडा मग बघा जग तुमच्या किती जवळ येत.

नारायण सरपंचांचा प्रत्येक शब्द आमची जीवनरूपी नौका कशी असली पाहिजे हे सांगत होता.

पैसा माणसाला काय करतो, जोडतो आणि तोडतो. शेठ लोकांच्या घरी लोक घाबरत लाजत जातात. का? पैशामुळे नाही बाळा, तर या शेठने गरीबाला रोजगार दिलेला असतो म्हूणन. नुसत्या पैशाने कोण शेठ होतं नाही. अरे!  गरीब लोकांना मदत करा, त्यांना तुमच्यापरीने काम द्यायाचा प्रयत्न करा. गरिबाला जागं करणारा शेठ होतो. 

जो माणूस आपल्या जवळ यईल त्याला सहकार्य केलं पाहिजे. तो आपल्या जवळ आला पाहिजे, रस्त्याने जाताना लोकांनी एकमेकांना आपुलकीने हाका मारल्या पाहिजेत. तरंच ती माणसं.

आज माझे पंचक्रोशी मध्ये नाव आहे  पोरं बाळ  तुमच्या सहकार्यने मोठी झाल्यात. येणाऱ्या प्रत्येकाशी माझी पोरं प्रेमाने वागत्यात. माझं नाव मोठं करत्यात. घरात धान्याची पोती भरून आहेत, पिठाची चिक्की आहे. लाईट आहे. पाणी आहे. सुखी समाधानी परिवार आहे. माय बाप राजा हे सगळं तुझ्यामुळे.

तुम्ही इथं येता म्हणून.......... आमच्या इथल्या लोकांची जीवननौका सुखाने भरून पुढं पुढं जातं आहे.

माणसाची जीवन नौका कशी असली पाहिजे याचा सुंदर उलगडा आम्हांला नारायण सरपंचांनी केला.

वासोटाचा प्रवास संपला होता. नारायण सरपंचांचा भरून आलेला ऊर, अभिमानाने फुललेले छाती, पानावलेले डोळे आणि त्यांचे आम्हाला लाभलेले प्रेम व सहकार्य यामुळे आम्हाला  बोटीतून उतरू वाटत नव्हते. 

आयुष्यातील प्रत्येक वळणावर ही वासोट्याची बोट आम्हाला पुढचा मार्ग दाखवत राहील. नारायण सरपंचांनी दाखवलेल्या वाटेवर आमचा जीवन नौकेचा प्रवास हळू हळू सुरु राहील.

चालत रहा!!!

वासोट्याची बोट | The Life Philosophy of Boatman वासोट्याची बोट | The Life Philosophy of Boatman Reviewed by Vaibhav Kavade on Monday, April 17, 2023 Rating: 5

3 comments:

  1. Khup chan sir... Lekhan apratim ahe👌

    ReplyDelete
  2. The life philosophy of boatman... 👍🏻
    Nicely written up 👌🏼

    ReplyDelete

Powered by Blogger.