संयमाची भाषा शिकवणारा "कल्याणगड" | kalyangad Fort Trek

रोहिडेश्वर ट्रेक संपवून परतीच्या प्रवासामध्ये एक मोठा ट्रेक पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावा याचे नियोजन झाले अनं आम्ही पुढील ट्रेकच्या नियोजनाला लागलो तो म्हणजे महाराष्ट्रातील अभेद किल्ला वासोटा. परंतु वासोटा हा दोन दिवसाचा ट्रेक असल्यामुळे पहिल्या दिवशी एक छोटा ट्रेक करावा अशी आमची सर्वांची इच्छा झाली आणि ठरलं दोन दिवसात दोन ट्रेक करायचे कल्याणगड -वासोटा!!

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी दिवस काढणे खूप कठीण काम. बरोबर ना? याउलट मी अस म्हणेन की, ज्याला स्वतःसाठी, स्वतः करिता वेळ काढता येतो,  स्वतःच्या इच्छा आकांक्षा कळतात तो माणूस स्वतःच ध्येय गाठण्याकरता काहीही करू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रवास महत्त्वाचा असतो कारण त्याशिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो.

बघता बघता दहा जण या ट्रेकिंग साठी तयार झाले. पहिल्या दिवशी कल्याणगड उर्फ नांदगिरी आणि वासोटा किल्ला सर करायचा असे ठरले. तब्बल तीन आठवडे याचे नियोजन चालू होते. सर्वांचा उत्साह भरभरून वाहत होता. आमचे सहकारी मित्र प्रवीण पाटील यांनी यावेळचा ट्रेक अविस्मरणीय करायचा असा चंगच बांधला होता. त्याच्यासाठी टीम बीएमडब्ल्यू,  चालत रहा ग्रुपचा एखादा टी-शर्ट अंगावरती असावा जेणेकरून ट्रेक करत असताना याचा फायदा व्हावा व ग्रुप बद्दल, ब्लॉग बद्दल सर्वांना माहिती व्हावी हा उद्देश.

ठरल्याप्रमाणे सुरुवातीला पुण्यातून निघून कल्याणगडला जायचे आणि कल्याणगड करून अजिंक्यतारा किल्ला, सातारा शहर दर्शन करून बामनोली येथे मुक्कामासाठी जायचं असं नियोजन होतं, पण सर्वांनी असं ठरवलं की कल्याणगडला जात असताना रस्त्यामध्ये आणखीन काही पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील का? त्या दृष्टिकोनातून लिंब या ठिकाणची या  बारा मोट ची विहीर बघायची असं ठरवलं. 

यावेळीचे नियोजन मात्र परफेक्ट होते. सकाळी सहा वाजता सोसायटी सोसायटीमध्ये दोन्हीही गाड्यांची पूजन करून आम्ही कल्याणगडाकडे प्रस्थान केले.


बारा मोटेची विहीर, लिंब - सातारा

सातारा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावरती असलेल्या लिंब गावातून बारा मोटचे विहिरीकडे आपणाला जाता येत. कोणतीही ऐतिहासिक वास्तू अथवा ठिकाणास भेट दिल्यानंतर फक्त काहीतरी बांधून ठेवलेल आहे म्हणून न पाहता त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे असते.

विहिरीचा इतिहास समजून घ्यावा म्हणून अजित शिंदे या गाईड सोबत विहिरीचा परिसर पाहण्यास सुरुवात केली. ही विहीर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात तयार करण्यात आलेली आहे. या विहिरीचे संपूर्ण काम वीरू महाराणी साहेब यांच्या कारकीर्दीत पूर्ण करण्यात आली असा शिलालेख विहिरीवरती आढळतो. 

विहीर दोन टप्प्यांमध्ये बांधलेली आहे पहिला टप्पा म्हणजे आड दुसरा टप्पा म्हणजे विहीर. शंभर फूट खोल असणाऱ्या विहिरी वरती दुमजली राजवाड्याचे बांधकाम आहे. या विहिरी वरती पंधरा मोट बांधलेले आहेत त्यापैकी 12 मोट हे चालू स्थिती असायचे म्हणून या विहिरीचे नाव बारा मोटेची विहीर असे पडले आहे.

पहिल्या मजल्यावर खलबदखाना असून असे समजते की, त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती ताराराणी महाराणी साहेब व पेशवे यांच्यामध्ये कित्येक मोहिमांची खलबते झाली.

संपूर्ण विहीर दोन एकर परिसरामध्ये बांधले गेले असून त्या विहिरीचे पाणी भोवतालच्या आमराईसाठी पुरवले जायचे. सुरुवातीला दहा मिनिटांचा वाटलेला पॉईंट संपूर्ण विहीर फिरून याची माहिती घेऊन आम्हाला दोन तास आनंदात कसे गेले समजलेच नाही.

आमचे दुसरे सहकारी मित्र अभय हे सातारा जवळ थांबलेले होते त्यामुळे त्यांना पिकप करू आम्ही कल्याणकडे प्रस्थान केले.

कल्याणगड सातारा शहरापासून पूर्वेला 53 किलोमीटर अंतरावरती आहे. किल्ल्याच्या पायथ्याला धुमाळवाडी हे गाव लागते. धुमाळवाडीला पोहोचण्याकरिता आम्हाला भर दुपारी बारा वाजले होते उन्हाचा तडाका खूपच होता त्यामुळे आम्ही गडबडीने ट्रेकिंगची सुरुवात केली.

कल्याणगड उर्फ नांदगिरी

कल्याणगड उर्फ नांदगिरी हा किल्लाशिलाहार राजा दुसरा भोज यांनी यांच्या कालावधीत बांधला गेला असावा असा अंदाज आहे.  

सूर्य माथ्यावरती असल्यामुळे यावेळी मात्र सर्वांचीच दमछाक होत होती. साधारणतः एका तासाने आम्ही गड माथ्यावरती पोहोचलो. नेहमीप्रमाणे गडाच्या पहिल्या दरवाजाची पूजा करून आम्ही गडावरती प्रवेश केला.

कल्याण गडावरती विविध धर्मांच्या देव देवतांचे वास्तव्य आहे. यामध्ये प्रामुख्याने 30 मीटरची गुहा आहे आणि गुहेमध्ये जैन धर्मियांची 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान यांची नवव्या शतकातील डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेली तसेच श्री गुरुदेव दत्त यांची मूर्ती आहे.

गुहेमध्ये अंधार असल्यामुळे बॅटरी घेऊन जाणे आवश्यक आहे. पावसाळ्यात गुहेमध्ये पाणी असते. भर उन्हामध्ये गड चढून आलेला क्षीण गुहेमधील गारव्याने नाहीसा झाला. संपूर्ण भक्तीमय वातावरणात गुहेमधील पार्श्वनाथ भगवान व श्री गुरुदेव दत्त यांची पूजा अर्चा केली, आणि चैतन्यदायी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झाली. 

पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाज्याकडे प्रवेश केल्यानंतर समोरच हनुमान मंदिर लागते. हनुमान मंदिर शिखरावरती प्रामुख्याने नागाचे शिल्प मिळते यावरून हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असावी असा अंदाज लावता येतो. मंदिरापासून पुढे गेला असता एक समाधी लागते ही समाधी कल्याण स्वामींची असावी असा अंदाज आहे. कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते आणि त्यांचे वास्तव्य या गडावर होते. गडावरती छोटे-मोठे पाण्याची टाकी आढळतात. थोडे पुढे आलं की श्री गोरखनाथ मंदिर आहे.

गडावरून अजिंक्यतारा, यवतेश्वर,  चंदन वंदन असे अनेक किल्ले स्पष्ट दिसतात. सह्याद्रीचा पूर्ण परिसर आणि त्यातून दिसणारा सर्व किल्ले पाहून आम्हाला जवळपास अडीच वाजून गेले होते. साधारणतः 45 मिनिटांमध्ये आम्ही गड उतार झालो. यावेळी मात्र मुक्कामाचा ट्रेक असल्याने सर्वांनी घरच्याच जेवणाचा बेत आखलेला होता गडाच्या पायथ्याला आंब्याच्या झाडाखाली शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही दुपारची भाकरी घेतली.साधारणता चार वाजता आम्ही कल्याणगड करून सातारा शहराकडे प्रस्थान केली. 

कल्याणगड ट्रेकने आम्ही काही शिकलो 

जीवनामध्ये फक्त शक्ती असून उपयोगाची नाही तर शक्तीच्या सोबत भक्ती देखील असावी.

एक हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरांची व भक्कम बुरुजांची मांदियाळी कल्याण गडावर पाहायला मिळते. जीवनामध्ये अनेक वेळा चढउतार येतील आणि याच्यावर मात करायचे असेल तर आपल्याला संयम धारण करावे लागेल आणि संयम धारण करायचं असेल भक्तीची जोड घ्यावीच लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता आलेल्या परिस्थितीवर छातीचा कोट करून पूर्ण शक्तीने- भक्तीने - ध्येयाने संकटावर मात करावी.

फिरूनिया गडकिल्ल्यात,

आज मोकळा श्वास घ्यावा,

प्रत्येक क्षण जगून घ्यावा!

अनुभवावे येथील दख्खनी वारे,

शहारलेल्या शौर्याने भरलेले,

छातीचा कोट करून,

उभा असलेले तट - बुरुजे!

ओढावी हिरव्यागार वनराईची चादर,

तृप्त व्हावे पिऊन कातळातले नीर!

करावी मैत्रीया सह्याद्रीच्या निळ्याशार नभाशी

करावा संकल्प या मनाशी,

झुंज देऊया आलेल्या संकटाशी!

वेड लावतो, पुन्हा पुन्हा खुणावतो, झपाटून सोडतो

हा सह्याद्री वेड लावतो!

प्रशांत सकळे


चालत रहा!!!!
संयमाची भाषा शिकवणारा "कल्याणगड" | kalyangad Fort Trek संयमाची भाषा शिकवणारा "कल्याणगड" | kalyangad Fort Trek Reviewed by Vaibhav Kavade on Tuesday, April 18, 2023 Rating: 5

5 comments:

  1. By reading your blog's I feel like I am also travelling and living these moments. Your story telling is so perfect👌 but i suggest you to go for vlogging 💯 it will create more interest and impact 😊

    ReplyDelete
  2. मित्रा वेडा आहेस रे तू...1नंबर 👌🏻जय शिवराय 🙏🏻🚩

    ReplyDelete

Powered by Blogger.