राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
कवी गोवंदाग्रजांच्या या महाराष्ट्रगीतातील ओळींची सार्थता पटवणारा परिसर म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास पठार व खोऱ्यातील वासोटा.
सह्याद्रीची दक्षिणोत्तर पसरलेली मुख्य रांग व या रांगेला समांतर घेरा दातेगडाची रांग. यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर बांधलेल्या धरणामुळे बनलेला शिवसागर जलाशय. या जलाशयाचे पाणी व सह्याद्रीची मुख्य रांग यामधील भागातील घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे अशी दुर्गम भौगोलिकता लाभलेला वासोटा त्यामुळेच सगळ्यांना खुणावत असतो.
बर्याच दिवसांपासून विश-लिष्ट मध्ये असलेला वासोटा ट्रेकचा बेत ठरला. संध्याकाळी सातच्या दरम्यान आम्ही बामणोली गावी अरोही नावाच्या हॉटेल मध्ये पुढच्या वासोटा ट्रेक साठी मुक्कामाला पोचलो. रात्रीचे जेवण उरकून आम्ही bonfire चा दिलखुलास आस्वाद घेतला. बऱ्याच दिवसांनी मैत्रीचा खळखळता झरा खूपच सुखावणारा होता. तिघांसाठी एक असे तंबुंची नदीकाठी आमच्या ९ जणांची छान राहण्याची व्यवस्था होती. दिवसभराच्या कल्याण गडाच्या स्मृती आणि किस्से आठवत कधी झोपी गेलो कळलेच नाही.
पहाटे अर्थातच पाच वाजल्यापासून तयारीला सुरुवात झाली , हलकाच नाश्ता होतच होता तेव्हाच बरोब्बर साडे सहा वाजता गडावर जेवण्यासाठी आमचा डबा तयार होता. आरोह हॉटेल ची आश्चर्याची बाब म्हणजे इथे संपूर्ण स्वयंपाक हा चुलीवर केला जातो आणि ते करणारे साळुंखे परीवरातले च सगळे सदस्य !
सूर्य डोंगरा अडून नुकताच दर्शन देतं होता , सूर्यनारायण चे मनोमन आवाहन करून बोटिकडे निघालो. साडेसात वाजता पहिल्याच बोटीने आमचा प्रवास सुरु झाला. बामणोली गाव नदीच्या किनाऱ्याला वसलेलं आहे त्यामुळे वाटेत ही नदी पार करून जावे लागते. खरंतर इथे कोयना आणि आणखीन दोन नद्या यांचा त्रिवेणी संगम आहे..इथे नारळ अर्पण करून बोट पुढे निघाली.
दुतर्फा डोंगरांची रांग , मनोहारी झाडांची हिरवी दुलयी डोळ्यात साठवत, पाण्याची वेगवेगळी रूपं बघता बघता एक दीड तास कसा निघून गेला कळलेच नाही. पुढे थोडे चालत जाऊन वनविभागाच्या कार्यालयातून पुढे प्रवास सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे नाव दिलेला वासोटा आम्हाला खुणावत होता.
सुंदर वनराई नी वेढेलेला परिसर आम्हाला सावली देत 'चालत रहा , नेटाने चालत रहा .' असेच म्हणत होता . इथे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात , लोद, माड, जांभुळ, रानमिरची अश्या कितीतरी.
आम्हाला बोटीतून घेऊन आलेले बोटमन सरपंच अंबवडे हे चालत बोलत ऊर्जा केंद्र आमचं मार्गदर्शन करत होतं! इथल्या पक्षांचे कुजन भुरळ घालत होते , एका विशिष्ट प्रकाराने शिळ घातली तर प्रतिसाद देखील देतं होते काही पक्षी! नावाडी मामाच आमचे गाईड होते. सत्तरीतही तरूणाला लाजवेल अशा जोशात चालत वाटेतील झाडे-झुडपे, ओढे-नाले, आढळणारे पशुपक्षी, प्राणी यांची माहिती देणार्या निसर्ग वाचनाबरोबरच, सत्तर वर्षांच्या अनुभवांचं सार असलेलं जीवनाचं तत्वज्ञान ऐकत दोन-अडीच तासांनी आम्ही माथ्याजवळ पोहोचलो.
पुढे वरच्या भागामध्ये मध्ये गडाकडे जाणारा मार्ग सावलीचा नव्हता अर्थातच निश्यच मूर्तिमंत तुमच्या समोर उभा असताना मार्गक्रमण सुरूच होतं..वरती गडावर पोचता च हनुमाना चं मंदिर आहे . अरे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान ह्या ओळी गुणगुणत असताना अजून एक आश्चर्य बघायला मिळालं. आरव अलंकार नावाचा एक सात वर्षाचा चिमुरडा त्याच्या काकासोबत अतिशय सहजपणे गड चढून आला होता. त्याच्या सोबत photo काढण्या चा मोह Team BMW ला नक्कीच झाला आणि काढला देखील.. वाटलं हा पुढे जाऊन नक्कीच एक मोठा माणूस बनेल, इतक्या लहान वयात तो हे करू शकला , मानलं बुवा !
काही उपद्रवी जीव इथे पहायला मिळाले , गडावर जांभळाच्या झाडावर चढून काही लोकं जांभळं पाडत होते. हे असं करण्यात लोकांना काय आनंद मिळतो देव जाणे. गडावर पावित्र्य राखण्यासाठी काही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, नाही का? असो.
तिथून थोडं पुढं निमुळत्या वाटेवरून आल्यावर डाव्या बाजूला दिसतो कोकणकडा व नागेश्वर सुळका. या नागेश्वर सुळक्यावर पोहोचण्यासाठी दोन अतिशय दुर्गम वाटा आहेत. एक आहे ती कोकणच्या बाजूने व दुसरी आहे ती ट्रेकच्या सुरवातीला लागणार्या ओढ्याच्या काठावरून. शिवरात्रीला या सुळक्यावरील पिंडीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते.
किल्ल्याचा तीन-चतुर्थांश भाग पाहून झाल्यावर आम्ही झाडाखाली बसून जेवण केलं व थोडी विश्रांती घेतली. नंतर गडाची दक्षिण बाजू पाहिली. सुरूवातीला आहे चुन्याचा घाणा व पाण्याचे टाके. थोडे पुढे आल्यानंतर लागतो बाबू कडा. तिथून समोर दिसतो तो जुना वासोटा. उजव्या बाजूला आहे सरळसोट दरी व तिथुन येणारा भणाण वारा. इथल्या इको पाँईंटवर आपल्या आवाजाचे तीन प्रतिध्वनी ऐकू येतात.
तिथून पुन्हा आम्ही दरवाज्याजवळ आलो तेंव्हा दुपारचे दोन-अडीच वाजलेले. आमचा गड उतरणीचा प्रवास सुरू झाला. तीव्र उतार, खड्यांवरून घसरणारे पाय यांमुळे शिस्तीत, तोल सावरत सुरवातीचा काही भाग पार केला. नंतर मात्र काहीसा सोपा असणारा प्रवास भरभर चालत तुलनेनं लवकरच पूर्ण केला.
तलावावर आमची बोट उभीच होती. पुन्हा तासभर प्रवास करून आम्ही दत्त मठाजवळ आलो. तिथले ब्रविमश्वर महादेव मंदिर, गजानन मंदिर, पादुकांचे दर्शन घेऊन पुन्हा बोटीत बसलो व टेंट-हाऊसजवळ आलो. बोटीतून उतरण्याआधी नावाडी मामांनी आपली जीवनगाथा आम्हाला थोडक्यात ऐकवली. प्रेम, माणुसकी, सहकार्य यांचं महत्त्व समजावलं. त्यांच्या या जीवनसफारी व नौकासफारी बदल कृतज्ञता व्यक्त करून व पुन्हा भेटण्याचं कबूल करून निरोप घेतला.
पर्वत, जंगल व तलाव अशी निसर्गाची अनेक रुपं एकत्र पहावयाला मिळणारा, त्याची भव्यता, दुर्गमता यापुढे नतमस्तक करणारा, मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अविष्कारांचं संयुक्त असं भव्य व मनोहारी दर्शन घडवणारा हा अविस्मरणीय वसोटा ट्रेक केल्यानंतर पुन्हा गोविंदाग्रजांच्याच महाराष्ट्र गीतातील पुढील ओळी आठवतात....
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
आपल्याच सुखदुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा त्याचे परिमार्जन करावे असेच जणू बोटीचा प्रवास आम्हाला शिकवून गेला. परावर्तित होण्याची तयारी ठेवूनच आयुष्याच्या नित्यनूतन अनुभवांना नव्या उमेदीने सामोरे जावे हा योगसिद्ध पाठच वासोटा आम्हाला शिकवून गेला.
गणेश कुलकर्णी - अभय मगदूम
चालत रहा!!!!!
निश्चयाने ओतप्रोत भरलेला "वासोटा" | Vasota Fort Trek
Reviewed by Vaibhav Kavade
on
Wednesday, April 19, 2023
Rating:
खूप छान... लेख खूप माहिती पुरवतो आहे आणि प्रसंग वर्णन वाचून एक इच्छा तयार होत आहे की या ठिकाणी जायलाच हवं !!!
ReplyDeleteखूप सुंदर... माहितीपूर्वक प्रसंग वर्णन वाचून मनात अतोनात इच्छा होत आहे इथे जाण्याची !!!
ReplyDelete