मित्र अभय याने नुकताच उत्तराखंड- बद्रीनाथ - जम्मू काश्मीर- पंजाब असा प्रवास केला. त्याने लिहलेला हा ब्लॉग -
*जन्नत का सफर*
_केल्याने देशाटन, मनुजा येते_ _शहाणपण_ असे आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवलेले आहेच. नवनवीन प्रांत, तिथली कला-संस्कृती, चालीरीती, खान-पान यांबद्दल मुळातच सगळ्यांना कुतूहल असते. कुणी देव-धर्मासाठी तीर्थाटन करतो तर कुणाला देश फिरून बघायचा असतो. मी फारसा धार्मिक नसलो तरी फिरणं आणी प्रवासासाठी कायम तयार असतो मग तो कोणत्या का कारणासाठी असेना. नातेवाईकांनी उत्तर भारताच्या ट्रीपसाठी विचारले आणी मी लगेच होकार दिला आणि काही महिन्यांच्या तयारीनंतर 30 मेला दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसलो.
*_उत्तराखंड_* :
दिल्लीत 1 जूनला पोहोचल्यावर लगेच त्या दिवशी आम्ही उत्तराखंडमधील हरिद्वार गाठलं जिथून आम्हांला जायचं होतं सुमारे 300 किमी दूर बद्रीनाथला. हा सगळा प्रवास होता डोंगररांगांमधूनचा. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे उंच डोंगरकडे आणी मधून तीव्र वळणे घेत जाणारा नागमोडी रस्ता. अक्षरशः जीव मुठीत घेऊन सगळे बसलेलो पण ड्रायव्हरचं सफाईदार चालवणं आणि खिडकीतून दिसणारं निसर्गसौंदर्य यामुळं हा प्रवास थोडाफार सुसह्य होत होता. वाटेत दोन-तीनदा जेवण व चहापानासाठी थांबून तब्बल बारा-तेरा तासांनी बद्रीनाथला पोहोचलो. हरिद्वारमधून निघालो तेंव्हा दिवसाचं तपमान 35° च्या दरम्यान असल्यानं सगळ्यांनी नाँर्मल कपडेच घातलेले. रात्री नऊ-दहाच्या दरम्यान बद्रीनाथला पोहोचल्यावर बसमधून उतरलो आणी सगळे अचानक थंडीनं कुडकुडायला लागलो. एकदम फ्रिजमध्ये बसल्यासारखं वाटंत होतं. दातावर दात आपटत होते आणी हाडे गोठवणारी थंडी काय असते याचा खरा अनुभव येत होता. क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यांनी बँगा खोलीत टाकल्या आणी अंथरूणात शिरलो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून मंदिर दर्शनासाठी म्हणून खोलीबाहेर पडलो आणी बाहेरील दृश्य पाहून अक्षरशः दिग्मुढ झालो. चारही बाजूंनी वेढलेले शुभ्र बर्फाच्छादित डोंगर आणी मध्येच बशीच्या आकारात वसलेला तो अलौकिक देवभूमी, तपोभूमीचा पवित्र परिसर. ज्यानं नेहमीचं अनेकांना भुरळ घातलीय त्या अतिभव्य गिरीराज हिमालयाच्या निकट दर्शनाने भारावूनच गेलो. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलेलं सर्वदूर बर्फ आणी त्यावर पडणाऱ्या सोनेरी किरणांनी झळाळून उठलेला तो दिव्य परिसर अद्भुतरम्य, अवर्णनीय असाच होता. त्यात हरवून गेलेल्यांना थंडीनं भानावर आणलं आणी गरम कपडे आणखी घट्ट लपेटून घेत मंदिराकडे गेलो. छोटीशी अलकनंदा नदी ओलांडताच मंदिराच्या पायऱ्या लागतात आणी शेजारी गरम पाण्याचं कुंड. निसर्गाचा किती अद्भुत चमत्कार - बर्फाच्या थंडगार पाण्याने वाहणाऱ्या नदीकाठी गरम पाण्याचं कुंड. या औषधी पाण्यात स्नान करून दर्शन रांगेत उभे राहिलो आणी पहाटेच्या चार वाजताच्या काकड-आरतीनंतर दर्शन घेतले. गर्भगृहात बद्रीनाथाशिवाय इतरही देव-देवतांच्या मुर्त्या पुजल्या जातात. बद्रीनाथाची मुर्ती व मंदिराच्या स्थापत्यरचनेवरून जैन व बौद्ध धर्मीय लोकही ते त्यांचंच असल्याचा दावा करतात. सध्या तरी हे हिंदु तीर्थक्षेत्र असून चार धामांपैकी महत्त्वाचे धाम असल्याने लाखो लोक दरवर्षी भेट देत असतात. हिवाळ्यातील अती बर्फवृष्टीमुळे ही मंदिर बंद असते तर मे ते नोव्हेंबर या काळात उघडे असते.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही शेजारील माणा या गावी गेलो. हे भारताच्या बाजूने शेवटचे तर चीनच्या बाजूने पहिले गाव. इथून चीन बाँर्डर जवळच आहे. इथंच सरस्वती नदी पहायला मिळते जिला तिथून जवळच अलकनंदा नदी येऊन मिळते. वानप्रस्थाश्रमानंतर इथूनच चालत जात पांडवांनी स्वर्गारोहण केले अशी आख्यायिका आहे.
दुसऱ्या दिवशी आम्ही परत हरिद्वारला आलो आणी गंगास्नान केले. पहाडातून बर्फाचं पाणी घेत वाहत असल्याने इथली गंगा नदी तुलनेने स्वच्छ व वेगवान आहे. काठावर जागोजागी घाट व मंदिरे असून सकाळ-संध्याकाळ गंगाआरती होत असते.
*_उत्तर प्रदेश_* :
हरिद्वार हून आम्ही उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक अशा हस्तिनापूरला भेट दिली. महाभारत काळात ही कौरवांची वैभवशाली राजधानी होती. इथं अनेक पौराणिक संदर्भ असलेली स्थळे व मंदिरे आहेत. जैन धर्मीयांसाठीही हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून अनेक सुंदर व भव्य जैनमंदिरांचा समुह सुशोभित जागेत पहायला मिळतो.
*_जम्मू-काश्मीर_* :
हस्तिनापूरहून परत हरिद्वारला येऊन आम्ही जम्मू साठी ट्रेन पकडली व कटरा येथे आलो. दरवर्षी लाखो लोक भेट देणाऱ्या सुप्रसिद्ध अशा वैष्णोदेवी मंदिर या शक्तीपीठाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही संध्याकाळीच बाहेर पडलो. सुमारे 13 किलोमीटर एवढे अंतर चालत डोंगरावरील मंदिर व गुहेत यायला आम्हाला सहा-सात तास लागले. बांधीव वाट, वरती छत, जागोजागी खाय-प्यायची व लाईट्सची सोय आणी रात्रीही भाविकांजी गजबज असल्याने प्रवास बिनदिक्कत झाला पण जाऊन-येऊन 26 किलोमीटर चालल्याने दमछाकही झाली. भवन व गुहेतील दर्शनानंतर कटराला परत पोहोचायला आम्हांला सकाळचे आठ-नऊ वाजले. दिवसभर विश्रांती घेऊन संध्याकाळी थोडीफार खरेदी केली. जम्मूची स्पेशालिटी असलेलं केशर आणी अक्रोड घेणं क्रमप्राप्तच होतं. कटराहून जम्मूमार्गे आम्ही अमृतसरकडे निघालो. वाटेत जम्मू-काश्मिरचं सौंदर्य ओसंडून वाहत होतं. चिनार व देवदार वृक्षांनी आच्छादलेले पहाड, दूरवरच्या उंच डोंगरांनी घातलेल्या पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या टोप्या, आल्हाददायक हवा, बर्फाचं पाणी घेऊन वाहणारे स्फटिकासारखे दिसणारे झरे आणी नहर, अधूनमधून छोटीमोठी गांवे लागली की दिसणारी गोजिरवाणी मुले, निवांत वृद्ध, देखणे तरूण, गुलाबी गालाच्या सुंदर तरूणी.... काश्मीर खरंच जन्नत आहे यारों.
*_पंजाब_* :
ओझरतं जम्मु दर्शन करून आम्ही अमृतसरला मुक्कामी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रसिद्ध असलेलं शीख धर्मीयांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर पाहिलं. एका पवित्र तलावाच्या मधोमध असलेलं हे मंदिर सोन्याच्या वर्खानं मढवलेलं आहे. मंदिराच्या मधोमध असलेल्या तख्तावर शीखांचा पवित्र ग्रंथ "गुरू ग्रंथसाहिब" ठेवलेला असून त्याच्यासमोर भाविक माथा टेकतात. सेवा व समानता ही शीख धर्माची वैशिष्ट्ये असून गुरूद्वारांमधून उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता सगळेच आपली सेवा देत असतात. इथल्या लंगरमधून दररोज सर्वांसाठी मोफत जेवण दिले जाते.
सुवर्ण मंदिर पाहिल्यावर जवळीलच जालियनवाला बागेला भेट दिली. आत्तापर्यंत इतिहासाच्या पुस्तकातच वाचलेलं, क्रूर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरनं घडवुन आणलेलं रक्तरंजित हत्याकांड घडलेलं हे स्थळ पाहताना गलबलून आलं. एका बंदिस्त जागेत जमलेल्या अबाल-वृद्ध लोकांवर बेछूटपणाने केलेल्या गोळीबाराच्या खुणा इथल्या भिंतीवर आजही अस्तित्वात आहेत. तिथल्या गँलरीजमधून विविध चित्रे, पुतळे, माहितीपत्रके व चित्रफितीद्वारे इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला. जनरल डायरच्या क्रूरपणाबद्दल चीड व हत्याकांडात बळी पडलेल्या लोकांबद्दल सहानुभूतीची भावना मनात निर्माण झाली. अशा ज्या अनेक भारतीयांनी हौतात्म्य पत्करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगून तिथल्या स्मृतीस्तंभाला अभिवादन करून बाहेर पडलो.
दुपारी जेवण व विश्रांतीनंतर आम्ही बाहेर पडलो अमृतसरहून तीसेक किलोमीटरवर असलेल्या भारत व पाकिस्तान देशांमधील प्रसिद्ध अशा अटारी-वाघा बॉर्डरवर. दररोज सुर्यास्तापुर्वी इथं एक बीटिंग रिट्रीट हा नाट्यपूर्ण समारंभ होत असतो. यासाठी हजारो लोक जमतात. समारंभाची सुरूवात देशभक्तीपर गीतांनी होते. या गीतांच्या तालावर झेंडा फडकवत मध्यभागी जल्लोषात नृत्य करण्याची संधी लहान मुले व स्त्रियांना मिळते. जय-हिंद, वंदे-मातरमच्या घोषणा व टाळ्यांच्या गजराने देशभक्तीपर वातावरण तयार होते. नंतर दोन्ही बाजूंच्या सैनिकांची परेड होते. जिथं देशांच्या सीमा मिळतात तिथं दोन्ही बाजूंनी गेट असून मधील जागेत दोन्ही देशांचे झेंडे फडकवलेले असतात ते परेडनंतर एक-साथ सन्मानाने खाली उतरवले जातात. दोन्हीकडचे सैनिक हस्तांदोलन करतात व गेट्स बंद करू़न हा समारंभ संपतो.
आम्ही पाहिलेल्या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानच्या बाजूला मोजून शंभरेकच लोक या समारंभाला उपस्थित होते पण भारताच्या बाजूने मात्र 5000 क्षमता असलेलं स्टेडियम गर्दीनं ओसंडून वाहत होतं. त्यांचा जल्लोष, टाळ्या, घोषणांच्या आवाजात हा समारंभ संपला व मनात देशभक्तीपर भावना व सैनिकांप्रती कृतज्ञता बाळगत आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी दिल्लीला येऊन गावाकडची ट्रेन पकडली व आयुष्यातील एका संस्मरणीय अशा प्रवासाची सांगता झाली.
तब्बल पंधराएक दिवसांत जैन, हिंदू, शीख धर्मस्थळांना व देशाच्या दोन सीमांना भेटी देत केलेला भारतातील चार राज्यांचा हा प्रवास सगळ्यांनी रुढार्थाने देव, देश आणी धर्मापायी केला असला तरी माझ्यासाठी मात्र तो उत्तुंग हिमालय, मैदानी उत्तर प्रदेश, जॉं-बॉंज पंजाब, पहाडी उत्तरांचल, दिलवालोंकी दिल्ली आणी स्वर्गीय जम्मू-काश्मीर अशा जन्नत का सफर हून काही कमी नव्हता.
*-* *_अभय मगदूम_*
जन्नत का सफर
Reviewed by Vaibhav Kavade
on
Sunday, June 18, 2023
Rating:
No comments: