अंधारबनातील प्रकाश | Andharban Jungle Trek

रिमझिम पाऊस सुरू झाला होता. अंधारबनातील ट्रेकच्या सुरुवातीला असणाऱ्या छोट्याशा बंधार्‍यावरून जात असताना मन उत्साहीत झालं होतं. चालताना जेव्हा आमची स्वतःची प्रतिमा पाण्यात दिसत होती त्यावेळी ते पाणी आम्हाला काहीतरी सांगू इच्छित होतं. एकीकडे सह्याद्रीतला तो रिमझिम पाऊस शरीरात उत्साहाची भरती आणत होता तर तो आमचा शांत पाण्यातील दिसणारा तो भाव वेगळच सांगून जात होता. निसर्गानं दिलेला संदेश आम्ही लागलीच ओळखला आणि ट्रेकमध्ये मी थोडं मागे पण उत्साहाने राहणं पसंत केलं.

अंधारबन म्हणजे नावातच सगळं आलं. सह्याद्रीमधील मुळशी तालुक्यातील हे घनदाट जंगल. जिथे सूर्याची किरण पोहचनं सुद्धा मुश्कील आहे. सह्याद्रीतील तो न थांबणारा प्रचंड पाऊस, अक्षरशः जमिनीपर्यंत पोहोचणारे दाट धुके, आणि पावला पावलाला आपले स्वागत करणारे चैतन्यदायी धबधबे. 

अशा या घनदाट जंगलातील ट्रेकला आम्ही नारळ फोडून व ग्रामदैवत वाघजाईच्या दर्शनाने केली. कदाचित नारळातील यां थोड्याश्या पाण्याने सह्याद्रीतील त्या धबधब्यांमध्ये वाहत, पावला पावलाला आमच्या सोबतीला येत आमचा आजचा ट्रेक गोड-  सुखदायी व सुरक्षित केला असावा.

यावेळी चालत रहाच्या सर्व सदस्यांनी उनाड भ्रमंती या ग्रुप तर्फे आयोजित अंधारबन ट्रेक मध्ये सहभाग घेतला होता. जवळपास 30 लोकांचा ग्रुप होता. आम्ही सर्वजण  धबधब्यांमध्ये  मजा, मस्ती, आनंद उपभोगत पुढे जात होतो. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 15 ते 20 धबधबे होते. या प्रत्येक धबधब्यांमध्ये मनसोक्त डुंबत या ट्रेकमधील पहिला टप्पा पूर्ण केला. जवळपास तास ते दोन तास आम्ही धबधब्यांमध्ये डुंबलो तेही अगदी सुरक्षितपणे. स्वतःची आणि ग्रुपची काळजी घेत घेत.

अंधारबनचा पहिला टप्पा जवळपास दहा किलोमीटर चालल्या नंतर पूर्ण होतो. प्रचंड कोसळणारा पाऊस, धबधबे, पाण्यातून वाट काढत चालावा लागणारा हा पहिला टप्पा आपल्या शरीराची अक्षरशः कस बघतो. शरीरामधील प्रचंड  ऊर्जा खर्च होते.

एका छोट्या पठारावरती आल्यानंतर आम्ही सर्वांनी वनभोजन केले. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर आमचा दुसरा टप्पा चालू केला. जो सह्याद्रीच्या अगदी खांद्यावर वसलेल्या छोट्याश्या हिरडी नावाच्या वस्तीतून खाली उतरत भिरा धरणाच्या पायथ्याजवळ जातो. हिरडी नावाच्या वस्तीमध्ये फक्त तीन ते चारच घर आहेत. ही वस्ती पाहताना समजलं सह्याद्रीतील वाड्या- वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांचे जीवन किती कठीण आहे. पण खरं सांगू का? आपल्यापेक्षा  कितीतर पट आनंदाने आणि समाधानाने हे आपले लोक सह्याद्रीच्या कुशीत जगत आहेत.

हिरडी वस्तीजवळ पोहोचलो होतो. अजून साधारणपणे पाच ते सहा किलोमीटरचा ट्रेक बाकी होता. जो की आम्हाला पूर्णपणे डोंगर उतरत खाली यायचं होतं. एका छोट्या वळणावरती आमच्या ग्रुप मधील शितल आणि काही इतर लोकांचा रस्ता चुकला. चार-पाच लोक चुकीच्या रस्त्याला गेले होते. मी, गणेश शुभम आम्ही तिघेही सर्वात मागे होतो त्यामुळे ही गोष्ट आम्हाला चटकन समजली. पंधरा-वीस मिनिटांमध्ये आम्ही रस्ता चुकलेल्या लोकांना त्वरित पाठीमागे बोलावून घेतलं. यावेळी ट्रेकचे प्रमुख जितेंद्र शिंदे यांनी दाखवलेली तप्तरता अगदी वाखाण्याजोगे होती.

वाट चुकलेल्या लोकांमध्ये आम्हाला वैशाली भेटली. ती पूर्णपणे थकलेली होती. वाट चुकली आहे असं समजल्यावर ती घाबरली. घांगारून गेली. मी आणि गणेशने तिच्यासोबत चालण्याचं ठरवलं.

वैशाली सर्वसाधारणपणे 50 वर्षाची तर असावी. जवळपास 70 ते 80 किलो वजन आणि तिच्या आयुष्यातील हा पहिलाच ट्रेक. वैशालीने स्वतः हे सांगितल्यानंतर मी सुन्न झालो. How is it possible? Why you came here? आत्तापर्यंत तू कशी चालत आलीस? माझ्या डोक्यामध्ये प्रश्नांचा भडीमार होत होता. बंधाऱ्यावरून चालताना निसर्गाने दिलेला संदेश, पाण्यातील प्रतिमेमध्ये उमटलेला तो भाव. संपूर्ण ट्रेक मध्ये मी उत्साहाने पण मी मागे का होतो याचा अर्थ मला त्याच वेळी उलघडला. आणि सुरू झाला प्रवास वैशालीला अंधार बनातील त्या घनदाट जंगलातून, मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाट काढत सुखरूपपणे तिला पायथ्याशी घेऊन जाण्याचा.....

डोंगरदर्‍यातील तीव्र उतारावरून वैशालीला खाली घेउन जाणं म्हणजे दिव्यच होतं. सुरुवातीपासूनच मी माग असल्याने एनर्जी राखून होतो. माझ्या दंडा खांद्यात ताकत एकवटत हळूहळू वैशालीला खाली घेऊन येऊ लागलो. सोबतीला गणेश होता. गणेश ही तब्येतीने नाजूक. मी वैशालीला सांगत होतो - वैशाली जी आपको कुछ भी नही होगा. मै आपको यहा से आराम से नीचे ले जाऊंगा. चाहे कुछ भी हो जाये! आप डरो मत! आपको कुछ भी होगा तो मै आपको उठा के लेके जाऊंगा बट मैं नीचे लेके जाऊंगा!  माझी ही दृढ निश्चयाची वाक्य ऐकून गणेशच्या अंगात 12 हत्तींचे बळ आलं.

जवळपास वैशालीच संपूर्ण वजन आम्ही खांद्यावर, कधी आमच्या हातावर पेलत पेलत तिला धीर देत खाली आणत होतो. आत्ता तर फक्त सुरुवात झाली होती अजून जवळपास चार किलोमीटरचा डोंगर खाली उतरायचा होता.

आमचा तो दृढनिश्चय पाहून कदाचित सह्याद्रीतील देवही जागा झाला असावा. सुरुवातीपासून कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली. दगडावरून आमचे पाय घसरून नयेत म्हणून, सह्याद्रीतील हा देव आमच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक दगड धोंड्यात ठाण मांडून बसला. आम्ही घसरू नये म्हणून मातीच्या प्रत्येक कणाला आमच्या पायासोबत हा देव घट्ट धरून ठेवत होता. अंधारबनातील ती वाघजाई आमची काळजी घेत होती.

अंधारबनातील प्लस व्हॅली या ठिकाणी येऊन पर्यंत जवळपास दोन तास झाले होते. आमचा चालत राहता ग्रुप तिथे आमची वाट पाहत होता. वैशालीला एका दगडावरती विश्रांतीसाठी बसवलं. मी आणि गणेश नेही विश्रांती घेतली. माझी तर शरीराची उजवी बाजू वैशालीचे वजन पेलून  अक्षरशः ब्लॉक झाली होती. 

अजूनही साधारणपणे दोन किलोमीटरचा टप्पा बाकी होता. आमची ती धडपड पाहून प्रवीण आणि दीपक ही सोबतीला आले. आता मात्र आम्हालाही धीर आला. मी, दीपक, गणेश, प्रवीण चौघे मिळून वैशालीला घेऊन खाली येऊ लागलो. काही केल्या रस्ता संपत नव्हता.

जवळपास सहा वाजले. जंगलामधील मच्छर  आमच्या नाका तोंडात घुसायला लागले. अंधार होत असल्याचे पाहून वैशालीचा धीर सुटायला लागला. तिची थाप वाढली. पावला पावलावर तिला दम लागायला लागला. ती तापाने फनफनायला लागली होती. अक्षरशः तिला पाऊल टाकणं कठीण झालं. प्रत्येक दहा पावलावरती आम्ही दोन ते तीन मिनिटांची विश्रांती घेत होतो. खाण्यापिण्याचा स्टॉक जवळपास संपला होता.

तेवढ्यात मला आठवलं. आज मी कधी नव्हे ते येताना प्रोटीन पावडरचा शेक घेऊन आलो होतो. जो माझ्या बॅगेमध्ये अजून  तसाच होता. तो प्रोटीन पावडरचा शेक वैशालीला दिला. वैशालीचे मिस्टर तेही आमच्या सोबत होते. ते बीपी आणि शुगरचे पेशंट. हे सगळं पाहून त्यांचेही हातपाय कापायला लागले होते . दीपक  त्यांना प्रत्येक वेळी धीर देत होता. हम लोग हर हाल में वैशाली को नीचे सुखरूप  लेके जायेंगे. Dont worry! हम है नां!!!!!!!

आता मात्र परिस्थिती उलटी झाली. अंधार पडत असल्याचे पाहून आम्ही चौघे जास्त घाबरलो. आता मात्र वैशाली आम्हाला धीर द्यायला लागली. भैया मै चलूंगी!  कुछ भी हो जाये मै चलूंगी! मुझे हर हाल मे चलते रहना है!  प्रोटीन पावडर चा शेक प्याल्याने तिच्या शरीरात थोडी ऊर्जा आली. आता मात्र आम्ही विश्रांतीची वेळ दोन मिनिटांवरून एक मिनिटावर आणली. कोणताही सेकंद वाया न घालवता मी आणि प्रवीणने तिचं वजनं दोघांच्याही खांद्यावर पेलत अक्षरशः पळत होतो.

संध्याकाळचे सात वाजले. काळाकुट्ट अंधार पडला. आम्ही मात्र थांबत नव्हतो. तेवढ्यात दूरवर एक बल्बचा मिनमिनता प्रकाश दिसला. त्या गर्द जंगलात तो दिसणारा मिनमिनता प्रकाश सूर्याहूनही तेजस्वी वाटला. आता आम्ही भिरा धरणाच्या पायथ्याजवळ आलो. आमच्या चौघांच्या  शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. मात्र मनामध्ये आनंदाचा झरा वाहत होता.

संध्याकाळी साडेसातच्या आसपास आम्ही भिरा धरणाच्या पायथ्याजवळ पोहोचलो आणि वैशाली सोबत आम्ही चौघे  सुखरूपपणे खाली पोहचलो. आम्ही चौघांनी एकमेकांकडे पहात स्मित हास्य केलं. एकमेकांना टाळी देण्याइतपत ही आमच्या शरीरात त्राण शिल्लक नव्हता.

आता माझे शरीर आणि मन शांत होत होते. गेली तीन-चार तास आमच्या मनात - शरीरात ठाण मांडून बसलेला सह्याद्रीचा देव आता आमच्या शरीरातून बाहेर जातं होता. डोंगर उतरताना रौद्र आणि भीतीदायक वाटणाऱ्या धबधब्यांचा दूरवरून मंजूळ स्वर आता कानी पडत होता. मनात प्रकाश निर्माण झाला. ह्या प्रकाशाने पुन्हा एकदा अंधारबनचे दर्शन घडवले. त्या कळ्या कुट्ट अंधारातून पुन्हा एकदा वाटेवरील प्रत्येक दगड धोंड्यांचं  दर्शन या प्रकाशाने आम्हाला दिलं. वाटेवरील येतानाचं प्रत्येक  झाड आता पुन्हा दिसू लागलं होतं. त्या प्रकाशात दूरवर आम्ही आलेल्या मार्गानी वाघजाई जाताना दिसली.

आमच्या रक्षणासाठी आलेला सह्याद्रीचा देव आता दूरवर निघून गेला. प्रचंड सारा प्रकाश देऊन. पुन्हा एकदा जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. आम्ही सुखरूप आल्याचे पाहून अंधारबनातील धबधबे  पुन्हा एकदा नव्या आनंदात - हसत खेळत ओसांडून  वाहू लागले........ तर आम्ही अंधारबनाने दिलेला प्रकाश घेऊन परतीला निघालो.... कदाचित आयुष्यात येणाऱ्या पुढील अंधारातून  यशस्वी मार्ग काढण्यासाठी.........
चालत रहा 🏃

- वैभव कवडे
9975100120

ठेचकाळणाऱ्या पायाला , थोडंसं सोसून बघ 
काहीच नाही झालं , असं म्हणत सोशिक बन !

चाचपडणाऱ्या सहप्रवाश्याला, कारूण्यानं बघ
काठी असेल त्याच्याकडे , तू काठीचाही आधार बन !

मरगळलेल्या भावनेला , थोडंसं बाजूला कर 
अंतस्थ अगदी नजीक, तू ऊर्जेचा स्रोत बन !


गोंधळलेल्या क्षणाला , किंचित सावरून बघ ,
आणि हो बालपण विसरू नको , थोडंसं उनाड बन !

उसळणाऱ्या धबधब्यांचे , वाघजाईचे अंधारबन,
पार करता करता झाले , अवघे प्रकाशमन !

---- गणेश कुलकर्णी

सदर लेखात वैशाली यांचा एकेरी उल्लेख हा आदराने करण्यात आला आहे.🙏 


Team BMW
 गणेश कुलकर्णी - प्रवीण पाटील - दीपक पाटील - संदीप सुंटी - शितल पाटील - प्रशांत सकळे - वैभव कवडे

खालील छायाचित्रात दिसणाऱ्या हिरडी वस्ती ते भिरा धरणाच्या पायथ्यापर्यंत आम्ही सर्वजण वैशालीला घेऊन सुखरूप खाली आलो.




अंधारबनातील प्रकाश | Andharban Jungle Trek अंधारबनातील प्रकाश  | Andharban Jungle Trek Reviewed by Vaibhav Kavade on Wednesday, July 26, 2023 Rating: 5

14 comments:

  1. Bmw team keep it up

    ReplyDelete
  2. छान जमलाय ब्लॉग 👌🏼 टायटलही समर्पक.....
    लेख वाचून सुधीर मोघ्यांचं गाणं आठवलं

    फिटे अंधाराचे जाळे
    झाले मोकळे आकाश
    दरीखोर्यातून वाहे
    एक प्रकाश प्रकाश

    ReplyDelete
  3. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार सुंदर असा ब्लॉग👌🏻

    ReplyDelete
  4. फारच सुंदर ..चालत रहा , सर्वांना सोबत घेऊन आनंद देत रहा..

    ReplyDelete
  5. Hats of you guys.

    ReplyDelete
  6. खुप छान

    ReplyDelete
  7. खूपच छान तुमच्या मुळे आम्हाला सर्व गोष्टी पहायला आणि माहिती मिळते
    तुमचा ग्रप खूपच छान आहे

    ReplyDelete
  8. खूपच छान तुमच्या मुळे आम्हाला सर्व गोष्टी पहायला आणि माहिती मिळते
    तुमचा ग्रप खूपच छान आहे

    ReplyDelete
  9. गणेश कांबळेJuly 25, 2023 at 10:49 PM

    आयुष्य आणि प्रवास खूप काही शिकवून जातात अनेक आठवणी बनवल्या जातात अनेक नवीन गोष्टी लिहिल्या जातात…नेहमीप्रमाणेच रोमांचक असा अनुभव लिहिला आहेस…आणि तुम्ही जगला आहात टीम BMW.

    ReplyDelete
  10. फारच सुंदर लेख...चालत रहा , सर्वांना आनंद देत रहा ..

    ReplyDelete
  11. छान... चालत रहा...

    ReplyDelete
  12. एक नंबर

    ReplyDelete
  13. 23 जुलै अंदारबन 2023 ट्रेकिंग करत असताना वैशाली मॅडम यांना अर्ध्या नंतरचा ट्रेक करताना खूप अडचणी येऊ लागल्या त्यांना अण्णांनी व टीम बीएमडब्ल्यू ने पूर्ण वरून खाली पर्यंत त्याना पकडून खाली सुरक्षित ठिकाणी घेऊन आले, यातून माणसाचे पैलू कळतात व एक प्रकारे आपल्या सर्वांना नवीन अनुभव आला अशा व्यक्तींना सह्याद्री🌳🌳 कधीही काहीही कमी पडून देत नसते अण्णा आपल्या शुभकार्यास सलाम🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻*

    *ट्रेक मधून आपण खूप काही शिकून गेलो*

    *जावेळी आपण ग्रुप मध्ये असतो किंवा एकत्र असतो त्यावेळेस कधीही फक्त स्वतःचा विचार करायचाचा नसतो सर्वांना सोबत घेऊन जाणे हे खऱ्या अर्थाने खऱ्या लीडरच काम असतं हीच आपल्या महाराजांची व सह्याद्रीची शिकवण आहे 🚩🚩🚩*

    ReplyDelete
  14. Khup sunder lihilay blog....and tumha sagalanche kautuk..

    ReplyDelete

Powered by Blogger.