शुक्रवारी रात्री केक आणला. सोसायटीमध्ये रात्री नऊ दहाच्या दरम्यान दीपक आणि संदीपचा वाढदिवस करण्याचं नियोजन ठरलं होतं. उगीचच मनात आलं, सोसायटीत केक कापण्यापेक्षा आपल्या बोपदेव घाटला मारुती मंदिराच्या समोर कापू. सगळ्यांनी मान्य पण केलं. अन मग बेत ठरला शनिवारी बोपदेवला जाण्याचा पण ह्यावेळी खास केक कापण्यासाठी.
बोपदेव घाट म्हणजे आमचं दुसरं मुक्कामाचं ठिकाण. गेली जवळपास नऊ वर्ष बोपदेव घाटला आम्ही जातोय. खरंतर आयुष्यातील अनेक कठीण चढ-उतार बोपदेव घाट मुळे सुसह्य झाले आहेत. बोपदेव घाट अगदी हृदयात स्थान करून बसला आहे.
शनिवारी बरोबर सकाळी साडेसहाच्या ठोक्याला घाटात पोहोचलो. आज पहिल्यांदाच गणेश आमच्या अगोदर येऊन पोहोचला. सोबत भाचा प्रसन्नला घेऊन आला होता.
गेली महिनाभर पावसाने दांडी मारली होती. आज मात्र अचानक ढग दाटून आले होते. जोरदार पाऊस पडणार असं वाटतच होतं. घाटात आज मोरगाव होऊन मेंढपाळांचे कळप आले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर दुष्काळाचे सावट अधिक जाणवलं.
रमत गमत, गप्पा मारत आम्ही घाटातून चालत होतो. दीपकचा 50 वा वाढदिवस. आमच्या ग्रुपमधील वयाने सर्वात मोठा पण सर्वात उत्साही व तरुण मनाचा सवंगडी. संदीप आमचा सोसायटीतील मित्र. कुठेही ट्रेकिंगला गेलो तरी जेवणाच्या बाबतीत अजिबात हयगय न करणारा सवंगडी. किती उशीर झाला तरी त्या त्या भागातील चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊनच घरी यायचं हा संदीपचा नियम. दीपक मुळे आमचे ट्रेकिंग अधिक अनुभव संपन्न झाले तर संदीप मुळे आम्ही ट्रेकिंग मध्ये मनाने व पोटाने कधीही उपाशी राहिलो नाही.
पावणे सातच्या दरम्यान मारुती मंदिराजवळ पोहोचलो. नेहमीप्रमाणे मारुतीला फुले वाहिली. मारुतीरायाचा गजर केला. गजर चालू असताना आज रिमझिम पावसाची सुरुवात झाली. केक कापण्याच्या अगोदरच दोघांनाही अट ठेवली जेवणाची. जेवण देणार असाल तरच केक कटिंग नाही तर घरला.😄
दीपक करमाळ्यामधून पुण्यात नोकरीसाठी आलेला. साधा, सरळ स्वभावाचा शेतकरी माणूस. गड्याचे केक कापताना हात थरथर कापत होते म्हणे. तर संदीप कर्नाटक मधून पुण्यात नोकरीसाठी आलेला. केक कापताना कधीही मनात विचार केला नसेल की कधीतरी आयष्यात बोपदेव घाटामध्ये भर पावसात वाढदिवस साजरा करू.
केक खाताना सहज मनात विचार आला. आता आलो आहे तर काळुबाईला जावू. वातावरण पण मस्त झालेला आहे. पाऊस पडत आहे. अंगात उत्साह सळसळत होता. म्हटलं आज आई काळुबाईच दर्शन घ्यायलाच लागतय. आम्ही तिथे कधीच गेलो नव्हतो. दीपकला सगळं बोलले टाक आज सुट्टी. कंपनीत फोन करून सुट्टीवर आहे असं सांगूस पर्यंत आम्ही सगळे आई काळुबाईच्या दिशेने निघालो.
आई काळुबाई हे बोपदेव घाटातील एक जागृत देवस्थान. आस्करवाडी - भिवरी या गावातील ग्रामस्थांचं ग्रामदैवत. घाटातील ट्रेक करताना कित्येकदा आम्ही काळुबाईच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल होतं.
घाटाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर अतिशय मुसळधार पाऊस सुरू झाला. घाटातील प्रत्येक गवताचं पात आज आनंदाने नाचत होतं. पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर झेलत होतं. इकडे आमची स्वारी खुशीत होती. आमच्यासाठी आजचा ट्रेक नवीन होता. ट्रेकचा रस्ताही नवीन होता. म्हणतात ना नवीन वाटेवरती नवीन मित्र तेही आपल्याला स्वभावासारखे भेटतात. घाटावर आम्हाला श्री. अनंत कचरे नावाचे व्यक्ति भेटले. पुण्यात रनिंग अकॅडमी चालवणारा हा अवलिया. पाच-दहा मिनिटं गप्पा मारत ओळख वाढवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो.
पावसाबरोबरच घाटात प्रचंड धुकं पडलं होतं. अक्षरशः पंधरा-वीस मीटर पुढचं काहीच दिसत नव्हतं. का कोणास ठाऊक? काळुबाईचा कळस मात्र आम्हाला इतक्या प्रचंड पावसात दुरून दिसत होता. तो कळसच आमची वाट निश्चित करत होता.
सुमारे अर्ध्या पाऊण तासाच्या वाटचालीनंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिर परिसर पाहताच आमच्या आनंदाला उधाण आले. प्रचंड कोसळणारा पाऊस, मंदिरांमधील शांतता, मनातील उत्साह आणि आमच्या उत्साहाला साथ देणारा निसर्ग.
आई काळूबाईचे दर्शन घेताना लाभलेले समाधान अवर्णनीय. ग्रुपमधील प्रत्येक जण खुश झाला. आई काळूबाईच्या दर्शनाने अंतर्मुख झाला. घाटातील बोपदेवाचं मंदिर, सोमेश्वराचे मंदिर आणि आज आई काळुबाईच्या दर्शनाने आमचा बोपदेव घाटातील ट्रेक खऱ्या अर्थाने पूर्ण झाला.
मंदिरामधून निघताना नवरात्रीमध्ये पुन्हा आईच्या दर्शनाला येण्याचं ठरवलं. पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. भर पावसात घामाच्या धारा वाहत होत्या. दर्शन घेताना आम्ही हळदीकुंकवाने भरलेला मळवट भर पावसात आजून ही टिकून होता. तो मळवट आम्हाला आशीर्वाद देत होता. ट्रेक पूर्ण झाल्याच समाधान देत होता.मनाला ताकत देत होता.अंगापायात शक्ती देत होता....चुकलेल्या वाटेवरून पुढे मार्ग काढत चालण्यासाठी....🏃♥️
चालत रहा.
मुक्काम पोस्ट बोपदेव घाट
Reviewed by Vaibhav Kavade
on
Tuesday, September 05, 2023
Rating:
मुकम्मल पोस्ट 👌
ReplyDeleteSuperb Wordings 👍
ReplyDeleteकाळुबाई च्या नावानं चांगभलं!!!
ReplyDeleteVery Nice.
ReplyDeleteSuperb....!!!!
ReplyDeleteखूपच सुंदर अनुभव ...
ReplyDelete