गडांचा राजा अन राजीयांचा गड - राजगड !!🚩🚩🚩

गडांचा राजा अन राजीयांचा गड !! राजगड !!🚩🚩🚩

सप्टेंबर महिन्यात राजगड बालेकिल्ला ट्रेक करायचा ठरला, पण बीएमडब्ल्यू ग्रुपचा कणा म्हणजे आमचं अण्णा व इतर सर्व जण गणपती उत्सव असल्यामुळे आपापल्या मूळ गावी होते. त्यामुळे राजगडाचा प्लॅन थोडा पुढे ढकलला. गणेश उत्सवाची सांगता झाल्यानंतर अनंतचतुर्थी नंतर सर्वांनी चंग बांधला एक ऑक्टोबरला  राजगड  बालेकिल्ला मोहीम फत्ते करायची आणि त्यानुसार नियोजनास  सुरुवात केली,  यावेळी ग्रुपमध्ये तीन सभासद वाढले होते,  ते म्हणजे आमचा इम्रान, मंजुनाथ  आणि तरुण तडफदार सचिन, यावेळी ग्रुप मध्ये एकूण 10 सदस्य त्यामुळे एक प्रकारचा उत्साह होता.

पुणे जिल्ह्यात भोर गावाजवळ नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर अर्थात, राजगड आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याची दुरुस्ती सुरू असताना सुवर्ण मुद्रांनी भरलेले हांडे सापडले. याच संपत्तीतून शेजारीच असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाचे काम सुरू झाले. एकीकडे स्वराज्याची उभारणी सुरू होती, तर दुसरीकडे राजगड आकारास येत होता. महाराजांनी जवळपास २६ वर्षे राजगडावरून स्वराज्याचा कारभार बघितला.

ठरल्याप्रमाणे सकाळी  सहा वाजता नारळ फोडून, गाड्यांचे पूजन करून  आम्ही किल्ले राजगडा कडे प्रस्थान केले. जसजशे आम्ही राजगडाकडे जात होतो तसतसा पावसाचा जोर वाढत होता. आम्ही गुंजवणे मध्ये पोहोचलो  नेहमीप्रमाणे आमचे मित्र राहुलजी बांदल (सुवेळा गार्डन रेस्टॉरंट) यांच्याकडे गाड्या पार्क केल्या व गुंजवणे चोर दरवाजा कडे कुच करायला सुरुवात केली, पावसाचा जोर वाढत चालला होता त्यामुळे चिखलवाटेतूनच पुढे चालत चालत आम्ही चोर दरवाजा पर्यंत पोहोचलो, चोर दरवाज्याचे पूजन करण्यासाठी पिशवी काढतोय तोपर्यंत माकडानी आमची फुलांची पिशवीच पळवण्याचा प्रयत्न केला पण सचिनने कशीबशी पिशवी हातात धरून ठेवली, त्यानंतर आण्णाने चोर दरवाजावर फुले ठेवून पूजन केलं व आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत गडावर पोहोचलो.

लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे राजगडावर तशी खूप वर्दळ होती यामध्ये युवक वर्ग जास्त प्रमाणात होता. आम्ही गडावर नजर टाकली तर काहीच दिसत नव्हतं कारण धुक्याच्या पांघरूणात सर्व राजगड दडला होता. टीमचा निर्धार होता काही झालं तरी बालेकिल्ला सर करायचाचं. बालेकिल्ल्याकडे पुढं चालत असताना  बालेकिल्ल्याची अभेद कातळ दिसत होती आणि सर्वच झाडावरती शेवाळ उगवले होते. बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा कडे चढाई करण्यास सुरुवात करतोय इतक्यातच माकडांचा घोळका साईडचे खांबावर बसून आमच्या पिशव्या ओढत होते त्यामुळे वरती जाणं अशक्य झालं होतं आणि गर्दी ही खूप होती, पण एकमेकाचा आधार घेत आम्ही पुढे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा जवळ पोहोचलो तेथे आम्हास पाटसचे गणेशजी कड भेटले.  मुख्य दरवाजाजवळ गणेशजी कड यांच्या मुलाने अतिशय मोठया आवाजात शिवगर्जना म्हटली. शिवगर्जनेने अवघा आसमंत पुन्हा उजाळला. आमचा त्राण निघून गेला. त्यानंतर वरती चढून सदर व राजवाडेचे दर्शन घेतले. खूप पाऊस व धुके असल्यामुळे तसं अस्पष्टच दिसत होतं सगळं, पण प्रेरणा मात्र भरपूर मिळतं होती. बालेकिल्ल्यावरती आम्हाला गणेश वाघ, औदुंबर धंगेकर, अंकिता खंदारे हे भेटले. त्यांच्याबरोबर हलक्या फुलक्या गप्पा केल्यामुळे ट्रेकिंगला मजा येत होती. नवीन सवंगडी गवसल्याचा आनंदही होत होता.

बालेकिल्ल्यानंतर आम्ही सर्वांनी सुवेळा माचीकडे प्रस्थान केले, राजगड पिवळ्या निळ्या व नारंगी रानफुलांनी बहरला होता व ते दृश्य अगदी स्वर्गापेक्षाही सुंदर असे होते. आम्ही सर्वजण चिलखती बुरुज येथे पोहोचलो. अगदी नावाप्रमाणेच बुरुजाची सर्व बाजू भक्कम व उत्कृष्ट असं ते साचेबद्ध बांधकाम अजूनही स्वराज्याची साक्ष देत आहे.

बुरुज उतरून एका खालून छोट्या दरवाज्यातून पुढे निघतोय तर गणपती बाप्पा जणू आमची वाटच पाहत होते. सर्वांनी गणेशाचे दर्शन घेऊन पुढे सुवेळा माचीकडे जात असतानाच   मोठ्या सुळक्यामध्ये गोल आकाराचं नैसर्गिक होल त्यालाच नेठे असे म्हणतात, अतिशय  उंच  असल्यामुळे उत्साही तरुण /तरुणी तेथे वरती जाऊन सेल्फी घेत असताना दिसले पण ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे प्रशासनाने तेथे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पुढे  सुवेळा माचीवर पोहोचलो. धुक्यामध्ये दाटलेला  हिरवा गार मुरुंब डोंगर दिमाकांत उभा होता, सुवेळा माची अत्यंत मजबूत व उत्कृष्ट असे ते बांधकाम.  सुवेळा माचीच्या पायथ्याला मारुतीरायाचं अत्यंत सुरेख असं शिल्प आहे. मारुतीरायाचं दर्शन घेऊन पद्मावती माचीकडे प्रस्थान केले. पद्मावती मंदिरामध्ये नारळ फोडून दर्शन घेऊन आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली, संपूर्ण राजगड पाऊस व धुक्यामध्ये न्हाहुन गेला होता.

जास्त पाऊस झाल्यामुळे उतरताना कसरत होती, त्यामुळे सर्वजण सावकाश व सुखरूप  सुवेळा गार्डनला पोहोचलो, राहुल दादांनी आमच्यासाठी मस्त जेवणाचा बेत केला होता जेवण आटोपल्यानंतर  आम्ही राजगडाविषयी राहुल दादांशी चर्चा करत वेळ कधी निघून गेला समजलं नाही. 

राहुल दादांशी चर्चा करत असताना जीवनमूल्ये किती महत्त्वाची आहेत आणि ती आपण राजगड व महाराजांचे चरित्र अभ्यासताना कशा पद्धतीने शिकू शकतो हे आम्हाला समजावून सांगितले. 

राजगड ट्रेक मधुन आम्हाला मिळालेली शिकवण 🚩🚩🚩🚩


1- जसा राजगडाचा पाया भक्कम होता, त्याचप्रमाणे आपली कार्यसंस्कृती भक्कम असली पाहिजे. उपलब्ध साधन-संपत्ती आणि इतर सर्व संसाधनांचा परिणामकारक आणि प्रामाणिक वापर करणे महत्त्वाचे आहे.

2- चांगल्या कामाचा पाया भक्कम आणि मूल्याधारित असेल, तर अनेक प्रयत्न करूनही विरोधक ते बिघडवू शकत नाही. 

3- कोणत्याही धर्माचा तिरस्कार करू नका. सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊ जाणे, सर्व प्राणीमात्रावर व निसर्गावर प्रेम करा, एकमेकास  सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो.

4- ध्येय गाठायचे असेल  तर शक्ती, युक्ती बरोबरच मनामध्ये सदैव चांगले विचार निर्माण करा. चांगल्या विचारांनी व प्रामाणिकपणा यांच्यामुळे गाठलेलं ध्येय हे चिरकाल टिकतं. 

5- सकारात्मक विचार असलेल्यांची संगत करा.

6- द्वेष, तिरस्कार,अहंकार,अहंभाव,गर्व  ही सर्व पराभूत माणसाची लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळीच आपल्या शरीरातून - मनातून टाकून द्या. 

7- सर्व धर्मांचा आदर, अध्यात्म - ध्यानधारणा,  तपस्या, वाचन, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि उत्तम आरोग्य हेच विसाव्या शतकातील सफलतेच गुढ आहे.

प्रवीण पाटील
चालत रहा.



गडांचा राजा अन राजीयांचा गड - राजगड !!🚩🚩🚩 गडांचा राजा अन राजीयांचा गड - राजगड !!🚩🚩🚩 Reviewed by Vaibhav Kavade on Friday, February 09, 2024 Rating: 5

12 comments:

  1. अतिशय सुंदर लिखान आणि प्रत्यक्षात गडाची आणि आपल्या प्रवासाची प्रतिमा डोळ्या समोर उभी राहिली ,
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  2. Your group is full of energy keep it up also the expression of your journey in words is great inspiring others to do the same

    ReplyDelete
  3. चित्रदर्शी लेखन... शिर्षकही लाजवाब

    ReplyDelete
  4. Superb,👍👍👍

    ReplyDelete
  5. जबरदस्त वर्णन आणि ओघवता बाज ...सुंदर ..

    ReplyDelete
  6. खूप सुंदर सर......

    ReplyDelete
  7. Wa wa wa wa wa........ खूपच छान

    ReplyDelete
  8. Khup Chan blog Aahe

    ReplyDelete
  9. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  10. Bapu to good...

    ReplyDelete

Powered by Blogger.