चपटदान मारुती, राजगड : एकतानता ब्रह्मउर्जेशी

मुळात ट्रेक सुरु करतानाच एक प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवत होता. काहीही झालं तरी राजगड बालेकिल्ला सह "सुवेळा माची" पूर्ण करायचंच अशी एक अकारण ओढ पावलं थांबू देत नव्हती. त्यातही वरूण राजा च्या कृपेमुळे रिमझिम पाऊस आणि ढगांची आश्वासक साथ ह्यामुळे थकवा येतच नव्हता.उशीर झाला तर जेवणाच काय, असा विचार कुठेच येत नव्हता.

चालत रहा ग्रुपच्या सगळ्याच मेंबर नी ग्रुप ची शिस्त तंतोतंत पाळली ! आपल्या उर्जे सोबत आनंद आणि संयम यांची सांगड घालत सह्याद्रीचे वेड लागलेले हे सगळे वेडे वीर चालत रहा ह्या तत्वाशी प्रमाणिक रहात मार्गक्रमण करत होते.सुवेळा माची म्हणजे बालेकिल्ला का अभेद्य होता ह्याच प्रमाण म्हणजे एक मजबूत तटबंदी. विधात्याने त्या वेळेच्या साधन सामग्रीचा आणि ते बांधणाऱ्या हातांनी केलेला एक समृद्ध साक्षात्कार ! चिलखती बुरुज हे तर केवळ आश्चर्य !

स्थापत्य, कला आणि मजबुती हे तिन्ही जिथे मिळतात तिथेच हे होऊ शकतं. प्रत्येक पावलागणिक महाराजांना मानाचा मुजरा करत नतमस्तक व्हावे असे ते खास क्षण अगदी खोलवर साठवत आम्ही निघालो पुढे. सुवेळा म्हणजे चांगली, योग्य वेळ ! ही माची जिथे संपते तीच अगदी पूर्वेला म्हणजे सूर्यनारायणाची किरणे इथे भरभरून आशीर्वाद देतात म्हणून ती सुवेळा अशी एक माहिती देखील मिळाली. ज्या शेवटच्या बिंदूवर वरच्या बाजूला पोचलो तिथून अगदी थोडंसं खाली एक चिंचोळी कमान आहे आणि एक माणूस आरामात जाईल एवढी जागा दिसली. काय असेल या कुतूहलाने वैभव आणि मी तिथे गेलो. आणि तिथे दगडात कोरलेले साक्षात मारुतीराया ! हा मारुती राया हा राजगड पेलून धरतो आहे अशा आवेशात तिथे उभा आहे!. आपसूक हात जोडले गेले , तादात्म्य होऊन त्या स्थळी असलेल्या ऊर्जेचा एक पवित्र अंश होण्याचं भाग्य लाभलं ! भरून पावलो ..! मनात आले की इथे कुणी तेल वहात नाही की कुठली दैनंदिन पूजा होत नाही की दर शनिवारी स्तोत्र म्हणत नाही.  पण ...इथेच खरी गंमत आहे...मानवी अस्तित्वाचा खुजेपणा जाणवल्या शिवाय ईश्वरी अंश समजुच शकत नाही आणि ईश्वरी अस्तित्वाची अनुभूती आल्याशिवाय माणूस म्हणून जगूच शकत नाही...! असच काहीसं वाटलं ..सुरुवाती पासून लागून राहिलेली ओढ ती ह्या अश्या वळणावर येऊन थांबेल अशी पुसटशी कल्पना देखील नव्हती ... मराठी तील एक जबरदस्त कवी/लेखक ग्रेस एके ठिकाणी म्हणाले आहेत .."काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे , जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उसळे" ....ही वीज खुपसून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मनोमन दंडवत कारण त्याशिवाय का ही स्वराज्याची राजधानी उसळत्या तलवारी सारखी आजही उभी आहे.

साधारणपणे आम्ही 15 ते 20 मिनिटं मारुतीरायासमोर उभे होतो. सुमारे चार ते पाच तास चालून आल्याचा कंटाळा आणि शिनवटा क्षणार्धात निघून गेला होता. डोक्यामध्ये व मनामध्ये अचानक सकारात्मक विचारांची निर्मिती व्हायला लागली. निसर्गामधील एका विशिष्ट अशा सकारात्मक ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत होता. आम्ही आमच्या मनामधील विचार निसर्गला सांगत आहोत असा भास होत होता आणि निसर्गामधील ती एनर्जी आम्हालाही विशिष्ट प्रकारचा संदेश देत होती जो आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. मी व गणेश पद्मावती मंदिरापर्यंत पोहोचूस पर्यंत आम्ही या ब्रह्म ऊर्जेचाअनुभव घेत होतो. त्या अनुभवलेल्या ऊर्जेमुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. आम्हा दोघांनाही आजच्या ट्रेकिंग मधला खरा अर्थ उमगला होता. आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो गुपित कळालं.

ट्रेक च्या सुरुवातीलाच राहुल जी बांदल यांची ओळख झाली. कुठलाच अभिनिवेश न बाळगता अगदी सहज जोडला जाणारा बांदलांचा सच्चा वंशज आणि पारदर्शी अभ्यासक ! राहुल जी आणि त्यांचे बंधू दोघेही तितकेच पटकन आपलेसे करून घेणारे ! ते सहजपणे बोलताना शिवाजी महाराजांचा जिरेटोप आणि त्याच्या बद्दल काही सांगत असताना तो विषय आपसूक वेद आणि ज्ञानेश्वरी ला स्पर्श करून गेला काही सेकंदात ! मनात म्हटलं असामी इंटरेस्टिंग आहे!  ट्रेक हून परत आल्यानंतर सविस्तर बोलू असे ठरले. 

राहुलजी नी सुरू केलेली नांदी होती तर वर उल्लेख केला गेलेली मारुतीरायाची प्रचिती हा आमच्या ट्रेक चा परमोच्च बिंदू! जेव्हा सविस्तर बोलणं झालं तेव्हा महाराजांच्या बद्दल एक वेगळच आयाम त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचे ब्रह्म तत्वाशी सुर जुळले होते. ब्रह्मांड आणि त्यातून मिळणारे अचूक संदेश ते पकडू शकत होते. त्यातील एक नमूद केलेली घटना म्हणजे महाराज एकदा घोड्यावरून जंगलातून जात असताना त्यांचा शेला धरणीवर पडला. त्याच ठिकाणी काही वेळ त्यांनी शांतपणे विचार केला असावा की इथेच हा शेला का पडावा..काहीतरी संकेत आहे म्हणून त्यांनी तिथे थोडंसं खणाण्याची आज्ञा केली आणि काय आश्चर्य, तिथे मुबलक गुप्तधन सापडलं!  आत्ताच्या काळामध्ये ज्याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात तो हाच ! 

आणखीन थोडीशी माहिती गोळा केल्याने समजले की हा मारुती रायाला चपटदान मारुती असं म्हणतात. त्याच्या एका हातात म्हाळुंगीचे फळ आहे तर दुसऱ्या हाताने तो वरदान देतो आहे. तो तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करतो. ह्या इथे जिथे मारुतीरायाचं शिल्प आहे तिथेच महर्षी ऋषिंचे देखील शिल्प आढळते. प्राचीन काळी ब्रह्मांडाची विद्या प्राप्त अनेक ऋषीमुनी नी इथे तपश्र्चर्या केली आहे, तोच हा मूरुंब देवाचा डोंगर. महर्षी ऋषी देखील इथे आले होते याचे तपशील आढळतात. ह्या स्थळाची प्रचिती देणारा अगदी मागच्या चार पाच वर्षातील हा प्रसंग अमेरिकेतील एक मनुष्य खुप दुःखी होता कारण त्याच्या मुलाला एक दुर्धर आजार झाला होता.बरेच काही केले तरी तो बरा होत नव्हता. मग भारतातील काही लोकांशी संपर्क करता करता त्यांना कुणीतरी त्या मुलाला चपट दान मारुती चे अधिष्ठान करा असे सुचवले आणि सलग काही दिवसांचे अधिष्ठान पाळले असता तो संपूर्ण बरा झाला इतकेच नाही तर ते कुटुंब इथे भारतात येऊन चपटदान मारुतीचे दर्शन देखील घेण्यासाठी राजगडवरआले होते. 

संपूर्ण विस्मयकारक आणि आकर्षणाचा सिद्धांताचा अनुभव देणारा आजचा ट्रेक! धन्य झालो !  अर्थात  छत्रपती शिवाजी महाराजांना ह्याचे आकलन असावे की प्राचीन काळी तपश्चर्या करून पावन झालेला हा मुरूंब देवाचा डोंगर आहे आणि म्हणून की काय भौगोलिक कारणाबरोबरच  या गुढ कारणामुळे सुरवातीला स्वराज्याची राजधानी इथेच उभारली असेल..!!

Ganesh Kulkarni - Vaibhav Kavade

चालत रहा 🏃

चपटदान मारुती, राजगड 




चपटदान मारुती, राजगड : एकतानता ब्रह्मउर्जेशी चपटदान मारुती, राजगड :  एकतानता ब्रह्मउर्जेशी Reviewed by Vaibhav Kavade on Friday, February 09, 2024 Rating: 5

5 comments:

  1. सुंदर अनुभव...

    ReplyDelete
  2. Superb experience at Rajghad

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर व अविस्मरणीय अनुभव

    ReplyDelete
  4. वैभव दादा सलाम तुमच्या या महाराष्ट्रात तील किल्ले मोहिमेला उत्कृष्ट ट्रेकिंग करतायत.

    ReplyDelete
  5. खूपच छान

    ReplyDelete

Powered by Blogger.