गडकिल्ल्यांची भटकंती करण्याचा नाद लागलेल्यांना सुट्टी आली की पर्वणीच असते. ट्रेकिंगचे नवनवीन बेत आखले जातात आणी तेवढ्याच उत्साहाने पार पाडले जातात. अशीच दिवाळीची सुट्टी आली आणी आमचा सदाशिवगडाचा बेत ठरला. कराडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेल्या ओगलेवाडीला आम्ही सकाळी सातच्या दरम्यान पोहोचलो आणी गडाच्या तळाशी गाडी लावून हजारमाचीच्या मार्गाने गड चढण्यास सुरूवात केली.
सदाशिवगडास चार माच्या आहेत. राजमाची, हजारमाची, बाबरमाची व वनवासी माची. यापैकी राजमाचीच्या मार्गाने गडावर लवकर पोहोचता येते पण बहुतांश लोक हजारमाचीच्या मार्गाने जाणे पसंत करतात. सुमारे हजारभर दगडी पायऱ्या असलेला हा मार्ग लोकवर्गणीतून बांधण्यात आलेला आहे. ज्या ज्या लोकांनी यासाठी आर्थिक सहकार्य केले त्यांची नावे पायऱ्यांवर कोरलेली आहेत. अगदी १९७० सालच्या आसपासचीही जुनी नावे आहेत. १९७८ सालचं 'लोकबहाद्दूर नेपाली' असं नेपाळी नावही आढळून आलं. वाटेशेजारच्या कातळांवर जागोजागी सुंदर चित्रे काढून खाली गडसंवर्धन, स्वच्छता, निसर्गरक्षणाचे संदेश लिहून जनजागृती करण्याचा स्थानिक मावळा प्रतिष्ठानाचा प्रयत्नही स्तुत्य आहे.
वाटेच्या दोन्ही बाजुंच्या उतारावरील हिरवळ, झाडे पहात साधारण पाऊण तासात आम्ही गडावर पोहोचलो. गड पाहण्यास सुरुवात करणार इतक्यात समोरून एक व्यक्ती आली आणी आम्ही कोठून आलो याची त्यांनी चौकशी केली. आम्हीही त्यांचे नाव विचारले असता ते 'पांडुरंग भोई' असून गेली अनेक वर्षे तेथील महादेव मंदीराची गुरवमामांसोबत पूचाअर्चा व स्वच्छता पाहण्याच काम करत असल्याचं कळलं. त्यांचा जन्म महाशिवरात्री दिवशी झाला व लहानपणीच त्यांच्या मनात शंकराबद्दल भक्ती निर्माण झाल्याने संपूर्ण आयुष्य त्यांनी याकामी वाहून घेतले आहे.
गेल्या अनेक वर्षांची पूजाअर्चना व भक्तीसाधनेमुळे त्यांना काही शक्ती व सिद्धी प्राप्त झाल्याचा ते दावा करत होते. त्यांनी आम्हांला तेथील पुरातन महादेव मंदिराची माहिती सांगितली. अनेक वर्षापूर्वी गडावर जनावरे चरण्यासाठी सोडली जात असत तेंव्हा एक गाय एका गच्च झाडकांडात जाऊन रोज आपला पान्हा सोडत असे. एके दिवशी लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता एक मोठ्ठे शिवलिंग आढळले. मग लोकांनी तेथील झाडेझुडपे स्वच्छ करून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापणा केली.
चांगदेव व ज्ञानेश्वरांच्या काळातील ते मंदिर असल्याची लोकवदंता असून या मंदिराची दगडी बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराबद्दलची ही आख्यायिका ऐकून आम्ही गाभाऱ्यात गेलो. त्या पुजारीकाकांनी पूजेची सर्व तयारी केली आणी मोठ्ठा शंखनाद केला. आम्ही आळीपाळीने पंचारती ओवाळली आणी शिवशंभोचा जयघोष करत मनोभावे दर्शन घेतले. सोबत नेलेला फराळ पुजारीकाकांनी नैवेद्य म्हणून दाखवला आणी आम्ही मंदीरासमोर थोडीशी आतषबाजी करून जणू गडावर दिवाळीच साजरी केली.
नंतर पुजारीकाकांनी आम्हांला सगळा गड फिरून दाखवला. सोबत इतिहास, धर्म, तत्वज्ञान यावर त्यांची अविरत वाणी चालूच होती. त्यांनी ऐकवलेली कर्मविपाकाची बूमरँग थिअरी विशेष होती. ज्याप्रमाणें बुमरँग जिथून सोडले तिथे परत येते तसेच आपले कर्मही मग ते चांगले असो की वाईट आपल्याकडेच परत येत असते.
सदाशिवगडाचा आकार डमरूप्रमाणे आहे. गडावर काही ठिकाणी जुन्या वास्तूंच्या पायांचे अवशेष पहायला मिळतात. महादेव मंदीरामागे चिंच विहीर आहे जिचे पाणी कधीही आटत नाही. तिथून एक भुयार सुरू होऊन गडाच्या पायथ्यापासून काही अंतरावर असलेल्या सतीच्या समाधीपर्यंत ते जाते असे लोक सांगतात.
मंदिर बांधण्यासाठी गडावरीलच दगड खोदून वापरल्यामुळे तयार झालेले दोन-तीन टाकेही गडाच्या पुर्व बाजूला असून त्यातील पाणी घोड्यांना पिण्यासाठी पूर्वी वापरले जाई. शेजारीच सुर्लीच्या बाजूने गडावर येण्यासाठी जो महत्त्वाचा मार्ग होता त्याच्या प्रवेशद्वाराच्या पायाचे दगडी अवशेष पहायला मिळतात. दगडी मार्गावरील खुणांना घोड्यांच्या टापांच्या खुणा म्हणून दाखवल्या जातात. शेजारीच थोडा उंचावर टेहळणी बुरूज आहे जिथून पश्चिमेला कराड व पूर्वेला सुर्ली घाटातील प्रदेशावर नजर ठेवली जाई.
परिस्थितीनुसार वेळोवेळी गडावर गंजी पेटवून रंगीत धूर काढला जायचा. हिरवा धूर म्हणजे 'आँल इज वेल', सर्व काही व्यवस्थित आहे तर लाल धूर म्हणजे शत्रूपासून धोका आहे. हा धूर जवळच्या आगाशिवगडावरून दिसायचा. तिथंही मग तसाच धूर काढून वसंतगडाला व वसंतगडावरून पुढे साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अगदी कमी कालावधीत सांकेतिक संदेश पोहोचवला जायचा. त्याकाळची ही जणू दूरसंचारप्रणालीच होती.
गडावर तळ्याशेजारी अलिकडे नक्षत्र-उद्यान बनवले असून त्यात २७ नक्षत्रे व १२ राशींची झाडे लावली आहेत. महादेव मंदीरासमोरील शिवकालीन विहीरीशेजारी हनुमान मंदीर असून त्याच्या बांधकामात एका ख्रिश्चन व्यक्तीने तसेच गडावरील अन्नछत्र शेड व बाथरूम उभारणीत एका मुस्लिम व्यक्तीने आर्थिक सहकार्य केल्याचे आम्हांला सांगण्यात आले. शिवकालीन स्वराज्य उभारणीत अठरापगड जाती-धर्माच्या लोकांनी जसा हातभार उचलला त्याच परंपरेने आजही गडाची देखभाल व संवर्धन सर्व समाजातील लोक एकोप्याने करत असून खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्र धर्म'च वाढवत आहेत.
भविष्याचा दूरदृष्टीने वेध घेत वेळीच आवश्यक ती व्यवस्था व तरतूद करण्याचे शहाणपण व वर्तमानातील आपल्या वर्तनाची टेहळणी करत, चांगलीच कर्मे घडत राहतील याचे अखंड अवधान बाळगण्याची शिकवण देणारा सदाशिवगड म्हणजे आद्य योगी शंकराची निरंतर सतर्कता व शिवाजी महराजांचे द्रष्टेपण यांचा अनोखा मिलाफ आहे असं म्हणावं लागेल 🙏
चालत रहा 🏃🏃🏃
अभय मगदूम
Team
अखंड अवधानी - सदाशिवगड
Reviewed by Vaibhav Kavade
on
Friday, November 17, 2023
Rating:
No comments: