नम्रपणे ' स्वाभिमान ' जपणारा: तुंग किल्ला
तिकोणा अगदी सर्रकन पूर्ण करून पायथ्याला आलो.खाली येता येता अजून एक गड होईल असं सतत वाटत होतं.सर्वांच्या सहमतीने तुंग कडे जाण्याचं ठरलं आणि उत्साही वातावरणात BMW चा चमू निघाला. या गडाला कठीणगड असेही म्हणतात. वाटेत एके ठिकाणी असा उल्लेख बघून जराशी धास्ती वाटली. पण आपल्या टीम वर विश्वास ठेवत पुढे निघालो. पायथ्याला साधारण 40 मिनिटात पोचलो. तिथे हॉटेल गारवा आहे म्हणजेच घरच म्हणता येईल, कार पार्क करता करता जेवणाची व्यवस्था तिथे केली परत येई पर्यंत ते करून ठेवतो म्हणाले. अगदी थोडीशी पोटात भर घातली आणि निघालो.
पायथ्याला, वीरगळ आहे. एखाद्या शुरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या दगडी शिल्पास वीरगळ म्हणतात. त्याची सविस्तर माहिती तिथे फलकावर आहेच.
पुढे या दुर्गाची माहिती कळाली..प्राचीन, मध्ययुग आणि अर्वाचीन म्हणजे साधारण 1482 ते स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत कित्येक महत्त्वपूर्ण लष्करी घटनांचा साक्षीदार म्हणजे हा कठीणगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नामकरण केले. एका विशिष्ट आणि दुर्मिळ धाटणीतील हनुमान मंदिर देखील इथे पायथ्याला आहे. कमरेस खंजीर, मिशीधारी आणि जान्हवेधारी अशी हनुमान मूर्ती याचे वेगळेपण टिकवून ठेवते !
पुढे मग 'जिभी रचनेचे ' हनुमानद्वारा तून आपला प्रवेश होतो..तिथे पुढेच, राजगडावर प्रथम दर्शन दिलेला, तिकोणा वर भव्य रुपात असणारा आणि इथे अजून वेगळ्या रुपात उभा असलेला चपटदान मारुतीराया ! विशेष म्हणजे ही चापट मारण्याच्या पवित्र्यात असलेली पायाखाली पनवती राक्षसीण दबलेली मूर्ती केवळ अवर्णनीय ! तिकोणा वर असलेली मूर्ती तिच्या पायात लंकीण राक्षसीण पायाखाली घेते.
पुढे अजून एक अनुभूती म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती! छोट्याश्या तळ्या शेजारी ह्या मुर्तीची नियमित पूजा अर्चना होत असलेला उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो! इथे नारळ वाढवून पुढे निघालो..
खुप खाली पासून दिसणारा स्वाभिमानाने फडकत असलेला 'भगवा ध्वज 'अक्षरशः श्वासागणीक स्फुरण चढवत होता..
पुढे चालत राहिलो....
माथ्यावर तुंगाई देवीचे मंदिर आहे. तसेच इथे पोढी म्हणजे पाण्याचा टाक आहे. माथ्यावरील सैन्याला पाण्यासाठी माचीवर उतरायला लागू नये म्हणून यांचे खुप महत्व होते. देवीचे आशीर्वाद घेतले आणि भगवा ध्वजाला नमन केलं आणि निघालो..
तुंग दुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले टाक. काताळातच अत्यंत सुबक स्थापत्य असलेली पाण्याची व्यवस्था म्हणजे टाक. दुर्गाची दुर्गमता वाढवण्यासाठी यांची खुप मदत व्हायची.
ह्या काताळाची माया खुप आहे आपल्यावर! एकिकडे कर्नल प्रॉर्थर ने इथे सुरुंग लावून केलेली नासधूस, फोडलेल्या पायऱ्या याचा उद्वेग आणि तरीही अतिशय नम्रपणे उभा असलेला हा तुंग दुर्ग ! मावळ प्रांतातील संरक्षणाची जागा. असं दुहेरी अनुभव साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
वारीची सुखद झुळूक येत होती. ह्या कातळा ने काय दिले असेल आम्हाला?.. पूर्णता ! दुर्गावर असलेली तुंगाईदेवी, मारुतीराया आणि उजव्या सोंडेचे गणपतीबाप्पा हे सगळे ईश्वरतत्व आम्हा येड्या भक्तांसाठी आसुसले असेल काय असं वाटून गेलं ! दोघेही ज्या बिंदूला एक होतात तिथे अगदी तिथेच हा दुर्ग किंचितसा आनंदाने डोलत ही असेल कदाचित कुणास ठाऊक?
खरंतर फक्त तिकोणा गड हाच एक आमच्या नियोजनात होता पण का कोण जाणे एक विचित्र ओढ जाणवत होती. सर्वानुमते ठरलं खरं, पण एक गोष्ट नक्की शिकलो.. एका बाजूला आम्हा सर्वांच्याच ताकदीची पुन्हा नव्याने जाणीव झाली पण दुसऱ्याच बाजूला हे असं सतत बदल करणं हेही फार योग्य नाही..अर्थात स्वाभिमान असलाच पाहिजे पण तो उन्माद न होता अतिशय नम्रपणे व्यक्त करता आला पाहिजे, नाही का?
चालत रहा 🏃
लेखन - गणेश कुलकर्णी
सहकारी - गणेश कुलकर्णी, सचिन पाचोरे, प्रशांत सगळे शितल पाटील, प्रवीण पाटील, संदीप सुंटी, देवेंद्र पाचोरे
नम्रपणे स्वाभिमान जपायला शिकवणारा : तुंग
Reviewed by Vaibhav Kavade
on
Friday, February 09, 2024
Rating:
Ganeshji tung trek che shrey tumhala jate…🙏🏻
ReplyDelete