एका बाजूला धरणाने अडवून धरलेलं पाणी त्याचे सुंदर दर्शन दुसऱ्या बाजूला नवरा - नवरी डोंगर आणि तिसऱ्या बाजूला पाचगणी चे पठार हे इतकं विलोभनीय चित्र आपण साठवून घेणारा कुठलाच कॅमेरा अस्तित्वात नाही! आपली दृष्टीची क्षमता दिवसेंदिवस वाढतेच आहे !
BMW टिम ने पार केलेलं एक यशस्वी पाऊल म्हणजे कमळगड ! प्रत्येक पदभ्रमंती सुरू करताना काय संदेश देतोय सह्याद्री माहीत नसते ..हा सह्याद्री आताशा बोलतो आम्हा सर्वांशी ! येडे लोक त्याला आवडतात !
सात जानेवारीच्या सकाळी साडेपाचला ठरल्या प्रमाणे सगळा चमू निघाला गडाच्या पायथ्याला पोहोचण्या साठी. वाई मार्गे वासोळे गाव आहे पायथ्याशी तिथे कार पार्किंग करून गडावर जाता येते. तिथे जाण्यासाठी आणखीन दोन मार्ग आहेत पण आम्ही हा निवडला. अर्थात पहिल्यांदा इथे जायचे असल्यामुळे कुठलाच आतताई पणा करायचा नाही हा टीम चा अलिखित नियम!
कमळगड हा गिरिदुर्ग आहे त्यामुळे अगदी सहज दिसणारी पायवाट सुरुवातीला अपेक्षे प्रमाणे आमची परीक्षा बघत होती. आपण ट्रेक व्यतिरिक्त खाणे वेळेवर घेतो का, पाणी योग्य प्रमाणात पितो का आणि एकंदरीत स्वतःच अवलोकन होत राहतं. खुप तयारी अजून केली पाहिजे असं सतत सह्याद्री सांगत असतो.
साधारण दीड तास चालताना आमच्या सोबत आणखी काही सवंगडी जोडले गेले, ते म्हणजे आपसूक संवाद साधणारे पक्षी. आम्ही आल्याची जणू काही वर्दी देत असावेत . आमचा सहप्रवासी प्रशांत खुप मोठा फॅन आहे ह्या शांततेत पक्षांचे हे ' राजस कूजन ' ऐकण्याचा ! एकाग्रता वाढवण्यासाठी हे एक उत्तम ध्यान आहे असा त्याचा विश्वास आहे.
मला मात्र ' ध्यान लागले रामाचे, दुःख हरले जन्माचे ' या ओळी गुणगुणाव्या वाटल्या ..कशाचा काही संबंध नसतो पण तरीही ! साधारण दोन तास चालल्या नंतर गोरक्षनाथ मंदिरा पाशी पोचलो . दरवाजा बंद होता खरतर ते एका घरासारखे आहे. त्यामुळे जरा बिचकतच दार उघडलं, प्रवीण नी आदेश दिला म्हटलं बघुया काय होतंय कारण हाका मारून काहीच प्रतिसाद येईना ! आत गोरक्षनाथ शांतपणे वसले आहेत ! अरे काय सांगू ..गोरक्षनाथ, त्यांच्या बाजूला त्रिदेव दत्तमुर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत शांत श्रीमान - योगी मूर्ती ! प्रार्थनेच्या एका टोकाशी आपण इतके अगतिक असतो आणि दुसऱ्या च टोकाला हे देव तत्व शांतपणे आपल्याशी काही संदेश देऊन गेलेले! काय संदेश होता तो.. कल्पकता! शिवाजी महाराजांच्या या गुणाचे चिंतन करत पुढे गडाकडे जायला निघालो .
गोरक्षनाथ मंदिराच्या थोड अलीकडेच असताना शिवाजी महाराजांच्या उद् घोष ऐकू येत होता आम्ही पण त्याला प्रतिसाद देत होतो आणि तिथे आम्हाला सामील झाले पाचगणीच्या ' संजीवन ' शाळेतले चार शिक्षक मित्र! किरण जोजरे - संगीत , अंकुश त्रिपाठी - हिंदी , श्रवण पाटणे - गणित आणि संगणक हे विषय शिकवतात. बोलक्या स्वभावाचे प्रयागराज, काशीहून इथे हिंदी शिकवणारे श्री.त्रिपाठी विशेष लक्षवेधी! एकंदरीत पाचगणी मधील शाळा, बोर्डिंग स्कूल, भाषा अश्या विविध गोष्टींवर गप्पा झाल्या. पुन्हा भेटण्याच्या कृतज्ञ भावनेने त्यांचा निरोप घेतला पुढे जेवण वाट बघत होत.
मंदिराच्या पुढे निघालो मुख्य गडाकडे. वाटेत एक घर आणि त्याच्या बाजूला बांधलेली एकच गाय दिसली. उगाचच ग्रेस च्या ' गायीचे डोळे करुण उभे की चांद निळाईतले! ' या ओळी आठवल्या !
ट्रेक सुरु केल्यापासून कौतुकाची गोष्ट म्हणजे गोरक्षनाथ प्रतिष्ठान ने अगदी मोक्याच्या ठिकाणी लावलेले दिशादर्शक फलक. खूपच मदत झाली त्यांची. अर्थात कल्पकता हा संदेश देखील त्यांचाच ! ' अरे तो औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लास्टिक बॉटल त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करते ' हा फलक तसेच ' भरलेली पाण्याची बॉटल गडावर घेऊन जाऊ शकता तर मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत ..? ' असे खोचक पण कल्पक संदेश दिसतात.
नवनिर्मिती करायची तर उथळ ज्ञानाने होऊ शकत नाही. जिथे विचार संपतो तिथेच थोडा ताण देणं आवश्यक आहे!
गडावर पोहोचल्यावर हुश्श म्हणून बसावेसे वाटे पर्यंत ही विहीर खुणावत राहते. खाली उतरत असताना थंड हवेची साथ करते! असं म्हणतात की एक खेळाडू आपल्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात जास्त ऊर्जा लावत असतो ते का ह्याची चुणूक म्हणून याच्या कडे बघायला हरकत नाही !
चालत रहा 🏃
लेखन - गणेश कुलकर्णी
टीम चालत रहा - प्रशांत सकळे, देवेंद्र पाचोरे, संदीप सुंटी, गणेश कुलकर्णी, प्रवीण पाटील
कमालीच्या कल्पकतेचा मार्गदर्शक : कमळगड
Reviewed by Vaibhav Kavade
on
Friday, February 09, 2024
Rating:
Very Nice, Keep it up 👍
ReplyDeleteGreat information..... Thanks for sharing
ReplyDelete