सह्याद्रीतील जुळी भावंडे चंदन-वंदन 🙏🚩

स्वराज्याचा ' संयमी ' साक्षीदार : वंदन

स्वराज्याचा साहसी ' कलंदर : चंदन

मावळ प्रांतातील किल्ले तिकोना व तुंग चालत रहा टीमने सर केल्यानंतर  प्रशांतने  सह्याद्रीतील जुळे भावंडे व  महादेव रांगेतील किल्ले चंदन-वंदन मोहिमेचा बेत आखला व 4 फेब्रुवारी रविवारी  दोन्ही किल्ले एकाच दिवशी सर करायचं ठरलं.

माझी रात्री थोडी तब्येत ठीक नव्हती पण एकदा ठरलं  की नियोजनात बदल नाही. सकाळी आपोआप तब्येत व सर्वकाही ठीक  हे फक्त सह्याद्रीच्या प्रेमामुळेच♥️

नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता आमच्या ग्रुपमधील वयाने मोठा पण मनाने तरुण असणाऱ्या दीपक पाटील याच्या हस्ते गाडीचे पूजन करून चंदनवंदनकडे प्रस्थान केले

सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुका यातील बेलमाची  गावामध्ये  आहे.

आम्ही पुण्याहून भुईंज गावापर्यंत आलो, हॉटेल विरंगुळा येथे नाश्ता केला  व पुढे मार्गस्थ झालो. किल्ल्याकडे जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक वाट खोलवाडी गावातून सुरू होते आणि दुसरी बेलमाची येथून  आणि तिसरी बनवडीपासून जी सर्वात सोपी आहे. आम्ही बनवडी गावांमध्ये गणेश मंदिराजवळ  गाडी लावली व  ट्रेकिंगला सुरुवात केली.

सर्वांचे मते आम्ही पहिला  वंदनगड सर करायचा ठरलं कारण उंचीने व आकाराने  मोठा असल्याकारणाने व सकाळी  ट्रेकिंग साठी इनर्जी खूप असते.


ट्रेकिंगला सुरुवात केली  सुरुवातीपासून आमच्या सोबत गावातील  कुत्रा सोबत होता. थोड्यावेळाने संदीपने त्याचं नाव  वाघ्या असं ठेवलं. आम्ही पाहिला टप्पा पूर्ण केला सर्वांनी मरीआई मातेचे दर्शन घेतले व पुढे डोंगर वाटे मधून वंदनगडाच्या महादरवाजा जवळ पोहोचलो,  वाटेमध्ये झाडे नसल्यामुळे उन्हाचा थोडा तडाका जाणवू  लागला  होता पण जसे पुढे जाऊ तसं  वंदनगड जाणून घेण्याविषयी कुतुहल वाढत होतं.


भोज दरवाजा पार करून गडमाथ्यावर पोहोचलो. सर्वप्रथम शिव वंदनेश्वर मंदिराचे दर्शन घेतले‌. भूक लागल्यामुळे थोडं  बाहेर  काढतोय इतक्यात  गणेशच्या हातातील  भडंगाची पिशवीच माकडाने पळवली आणि त्या क्षणाला गणेशने  हवेमध्ये  उडी मारली  आणि बाकीचं खाण्याचं साहित्य  त्यामुळे थोडं खाण्यासाठी तरी मिळाले.  गणेशला थोडा वेळापुरत  ऑलम्पिकचा ऍथलेटिक्स  असल्यासारखं वाटलं.


वंदनगड उतरण्यास सुरुवात केली तसं नजर चंदनगडाकडे  आपोआप वडू लागली. खाली उतरताना आम्हाला  अहमदनगरचे तीन सहकारी भेटले  होते तेही आमच्यासोबत  चंदनगड कडे चालले होते. खाली येत असताना  आम्हास  संदीप पवार हे पत्रकार भेटले त्यांनी दोन्ही गडाची माहिती अतिशय सुंदर रित्या आम्हाला सांगितली.


आम्ही परत  मरीआईच्या मंदिरापासून चंदनगड कडे  मार्गक्रमण  केले, चंदनगडाच्या सुरुवातीलाच पायऱ्या  असल्यामुळे  व भर दुपारची वेळ  त्यामुळे चंदनगड वरती चढताना  फिटनेसचा कस लागला होता त्यातच आमच्याजवळ सर्व पाणी संपलं होतं आणि तेथे कोठेही  पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत नाहीत  त्यामुळे जरा दमछाक झाली  होती.  चंदनगडावर पोहोचताच पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन  नेहमीप्रमाणे नारळ फोडून पूजन केले  या मंदिराचे वैशिष्ट्य असं की  हे पंचलिंगी महादेव मंदिर आहे. थोडी विश्रांती घेऊन सर्व चंदनगड पाहून झाल्यानंतर खाली  उतरताना पर्यायी वाटेने आलो त्यामुळे  खाली लवकर पोहोचलो.




खाली उत्तरेपर्यंत वाघ्या आमच्या सोबतच होता. उतरल्यानंतर लगेचच पाणी भरपूर प्रमाणात पिले व त्याबरोबरच थंडगार उसाचा रसाचाही आस्वाद घेतला  थोडी विश्रांती घेऊन  परतीचा मार्ग धरला.

चंदन वंदन ट्रेक मधून काय शिकलो🚩


1.इसवी सन 1100  काळापासून हे दोन  गड किल्ले  एकमेकांना जोडले गेले आहेत  या दोघांचे नाते आजही असेच टिकून आहे तसेच आपल्याही आयुष्यात  अशीच नाती टिकवून ठेवायची आहेत.

2. गणेशने ज्या पद्धतीने उडी मारली  त्यावरून आपल्यावर कोणतीही संकट आली तर आपल्याला त्या संकटातून मार्ग काढता यायला हवा.

3. ज्यावेळी आमच्याकडे सर्व  पाणी संपले होते त्यावेळेस  फक्त इच्छाशक्तीच होती त्यामुळे प्रखर इच्छाशक्ती असल्यास  कोणत्याही अडचणीवर मात करता येते.

4. आमचा सोबती वाघ्या  यांनी शेवटपर्यंत आमची साथ सोडली नव्हती तसेच आपणही आयुष्यामध्ये  एखाद्या बरोबर मैत्री केली  तर शेवटपर्यंत साथ निभावणे हे आपलं कर्तव्यच आहे.

चालत रहा 🏃

लेखन - प्रवीण पाटील

सहकारी - गणेश कुलकर्णी, प्रशांत सकळे आणि संदीप सुंट

सह्याद्रीतील जुळी भावंडे चंदन-वंदन 🙏🚩 सह्याद्रीतील जुळी भावंडे चंदन-वंदन 🙏🚩 Reviewed by Vaibhav Kavade on Friday, February 09, 2024 Rating: 5

2 comments:

  1. आज तुमचा टीममुळे पून्हा एकदा दोन नवीन गड केल्याचंची ओळख झाली.पुढचा वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️❤️.

    ReplyDelete

Powered by Blogger.