निष्ठा, प्रामाणिकपणा, कणखरपणा आणि सुरक्षितेच महत्त्व पटवून देणारा लोहगड | Lohgad Fort Trekking Blog | चालत रहा

साधारणता दीड वाजता आम्ही विसापूर किल्ला पूर्णपणे पाहून पायथ्याला आलो. वरून सूर्यदेव आग ओखतच होता. आशीर्वाद सुद्धा देत होता. सर्वांना सर्वांना भरपूर भूक लागली होती, हलकासाच नाष्टा आणि उसाचा रस घेऊन आम्ही बरोबर दोन वाजता लोहगड ट्रेकची सुरुवात केली.

 गडाच्या पायथ्याला सुरुवातीलाच मारुतीरायाच्या टीमने (वानर गॅंग )आमचे स्वागतच केले. कसाबसा मार्ग काढून आम्ही ट्रेकची सुरुवात केली. लोहगड हा पुरातत्त्व विभागाकडे असल्याने आपणाला पायथ्यापासूनच पायऱ्या लागतात पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा लागला पेशव्यांनी हा दरवाजा बांधला होता अत्यंत सुंदर सुबक आणि कलाकुसर असलेला हा दरवाजा.


गणेश दरवाजा पार केल्यानंतर मात्र डोळ्यांमध्ये लोहगडाची वैभव उमटत होते कसा असेल ना त्यावेळी अत्यंत भक्कम बेलाग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात उत्तम किल्ला.

सगळे दरवाजे हे शत्रूच्या डोळ्यात धुळ फेकण्यात तरबेज. गणेश दरवाजा पाठोपाठ आपल्याला नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा लागतो. महादरवाजा सगळ्यात मुख्य दरवाजा आहे या दरवाजावर हनुमान मूर्ती कोरलेली आहे.

महादरवाजाचे महाकाय रूप पाहून माझे मन इतिहासामध्ये गेले. छत्रपती शिवाजी राजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतले आणि लोहगड विसापूर परिसर स्वराज्यात सामील करून घेतला.

सुमारे दोन वर्षे शाहिस्तेखान पुण्यामध्ये तळ ठोकून होता. प्रचंड नुकसान रयतेचे झाले होते आणि छत्रपतींनी विचार केला की हे नुकसान भरून काढायचे. स्वकीययांच्यावर केलेला वार छत्रपतींनी व्याजासहित परत केला.

खानाची लाल महालात घुसून तीन बोटे छाटली आणि रयतेचे झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी मुघलांचे सुरत बंदर लुटण्याची ठरवले. सुरतीची पहिली लूट ही घोड्यावरून करण्यात आली आणि आलेले लुटीचे सर्व धन हे हे लोहगडावर ठेवण्यात आले होते.

महादरवाजावरून त्या प्रसंगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले, कोसो दूर दिसणारे धुळीचे लोट, शिंग तुताऱ्या यांच्या ललकार्या आणि हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी चे घोषणा !!! आणि किल्लेदारांनी दिलेली आज्ञा ……त्या बत्ती तोफांना राजे खासी जीत घेऊन आले आहेत.

गडावरून दागलेले तोफांचे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमणारे आवाज जणू काही माझ्या कानात छत्रपतींच्या यशाची कीर्ती घुमवत होती आणि मी भानावर आलो.

अशा या महादरवाजाच्या सुंदर कलाकृतीच्याभोवती संदीपला मात्र फोटो काढण्याचा मोह काय आवरत नव्हता. महादरवाजावरती आदराने झुकून आम्ही गडावरती प्रवेश केला.

गडावरती प्रवेश केल्यानंतर राजसदर लागते आणि इथून थोड्याच अंतरावरती महादेवाचे मंदिर आहे त्याच्या शेजारी एक सुबक तलाव आहे. विसापूर पाहताना आम्ही ठरवलेले की कितीही वेळ झाला तरी दोन्ही किल्ले संपूर्ण पाहिल्याशिवाय परत फिरायचं नाही. त्यानुसार आम्ही गडाच्या उजव्या अंगाने चालण्यास सुरुवात केली.

सूर्यदेव डोक्यावरच होता आणि प्रवीण आणि संदीप ना रील काढण्याचा मोह काय आवरत नव्हता. आज सकाळपासून त्यांनी देवेंद्र कीर्तीला काय सोडले नव्हते, व्हिडिओ काढून बॅटरी संपलेली मात्र यांची एनर्जी काय संपत नव्हती.

बघता बघता आम्ही कधी गडाच्या उत्तरेकडील टोकावर जाऊन पोचलो. लोहगडावरून आजूबाजूच्या परिसरातून तुंग तिकोना मोरगिरी हे किल्ले दिसतात. आजकाल एखाद्या गडावरती पोहोचल्यानंतर आजूबाजूला नजर फिरवून किल्ला ओळखण्याची जणू स्पर्धा आमच्यात लागलेली असते. आज कुठून एवढी ऊर्जा आलेली काय माहिती डोक्यावरती सूर्य आणि सर्वांना विंचू कडा पाहण्याचा झालेला मोह.

भर उन्हात पाच जणांचा टोळकं ही सह्याद्री बेलागपणे फिरत होती. एखाद्याने तरी म्हणावं की बास झालं चला खाली, तर नाही विंचू कडा बघायचाच. पण आज काय वेगळं झालं होतं काय माहित बघता बघता आम्ही विंचू टोकावर जाऊन पोहोचलो तोपर्यंत साडेचार वाजलेले, सूर्य मावळतीला आलेला होता. मावळणाऱ्या सूर्याचे सह्याद्रीतील मावळात विहंगम दृश्य ते काय वेगळेच होते.

पवना धरणाचे बॅकवॉटर आणि त्याच्यामध्ये उमटणारे तुंग किल्ल्याची छबी ही काय मोहक दिसत होती. 
विंचू कड्यावरती शांत चित्ताने आमचे सहकारी मित्र गणेश बसलेले होते जणू काही त्यांचे सह्याद्रीशी हितगुज चालू होते. हा सह्याद्री आहे ना हा थकलेल्याला गोंजारतो, मायेने कुरवाळतो, मनमुराद बोलतो आणि बोलायला भाग पाडतो. मनात जे काय भरलेला आहे ते सर्व बाहेर काढतो आणि त्याला पुन्हा लढण्याची प्रेरणा देतो. अशा या सह्याद्रीचे हे रूप जसं मला जाणवतं तसंच गणेश ना देखील जाणवतं हे आज मला समजलं!

असो विंचू कडे वरती थ्री सिक्सटी डिग्री मध्ये व्हिडिओ काढल्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला. आजच्या दोन्ही ट्रेकचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ याचा सगळ क्रेडिट आमचे सहकारी देवेंद्रकीर्ती यांना जातं बरं.
विंचू कड्यावरून परतताना गणेशजी मात्र कमालीचे भावुक दिसले. थोड्यावेळासाठी त्यांनी अश्रूला वाट मोकळी केली, त्यांचं मन हलकं झालं असावं आज. नेहमीप्रमाणे आमचे सहकारी प्रवीण यांनी त्यांना जादूची झप्पी दिली आणि दिलासा दिला.
विंचू कड्यावरून परतल्यानंतर आम्ही 16 कोणी तलाव पाहिला. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना. तलावानंतर आम्ही गडावरील महादरवाजा शेजारील महादेव मंदिरामध्ये प्रवेश केला. देवेंद्र कीर्ती आणि गणेश जी यांनी महादेवाची मनोभावी सेवा केली. थोडा वेळ मंदिरामध्ये ध्यानस्थ बसल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला.


सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली सह्याद्रीतील भटकंती ही संध्याकाळी साडेसहा वाजले तरी काही थांबत नव्हती आज मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरती कमालीचा आनंद वाहत होता, कारण चालत राहा ग्रुपच्या वाघांनीअजून एक गड फत्ते केला होता.

लोहगडाचे वैभव पाहून आम्ही काय शिकलो.

जीवनाच्या प्रवासामध्ये कणखरपणा असावा पण त्यासोबत स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी ही तरतुदी असावी.

सुरतेवरून आणलेली लूट एकाही रुपयाला हात न लावता जशी सुरत मधून निघाली तशी ती पूर्ण गडावरती पोहोचली. हे सर्व धन स्वराज्याच्या कामे उपयोगाला आले होते यातून काय बोध घेता येतो, निष्ठा ही आपल्या व्यवसायावर आणि प्रामाणिकपणा हा आपल्या कामावरती असावा.

आजच्या काळामध्ये स्वतःला लोहगडा इतकच भक्कम आणि बेलाग बनवावा की छत्रपतींची नजर आपणावर पडावी म्हणजेच यशाची नजर आपल्यावरती पडावी एवढा की ज्ञानरूपी धनाचे वैभव ओसंडून वहावे. 

चालत रहा 🏃

 लेखन - प्रशांत सकळे

टीम - संदीप सुंटी, प्रवीण पाटील,  देवेंद्र पाचोरे,  गणेश कुलकर्णी आणि प्रशांत सकळे
निष्ठा, प्रामाणिकपणा, कणखरपणा आणि सुरक्षितेच महत्त्व पटवून देणारा लोहगड | Lohgad Fort Trekking Blog | चालत रहा निष्ठा, प्रामाणिकपणा, कणखरपणा आणि सुरक्षितेच महत्त्व पटवून देणारा लोहगड | Lohgad Fort Trekking Blog | चालत रहा Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, February 25, 2024 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.