मन सक्षम - मजबूत बनवणारा किल्ले विसापूर | Visapur Fort Trekking Blog | चालत रहा

तिकोणा - तुंग, चंदन - वंदन आणि त्याच मालिके मधील तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे विसापूर - लोहगड !  

'चालत रहा ' टीम च्या शिस्ती प्रमाणे आम्ही साडेपाच च्या सुमारास भेटलो आणि प्रवास सुरू झाला. दोन गड किल्ले पूर्ण करायचे ह्या विचारानेच भारावलेले होतो. आत्मविश्वास आहेच आणि जोडीला मित्रांची निर्भेळ साथ असेल तर अजून जास्त आनंद होतो. रस्त्याने जाताना हॉटेल शोधता शोधता कधी आम्ही मळवली फाट्यावर जाऊन पोहोचलो समजले नाही. दणकून नाष्टा केला ! आमचा सहकारी संदीप खाण्याच्या बाबतीत जरा आग्रही असतो पण त्याचा फिटनेस देखील कौतुक करण्यासारखा आहे !



8.30 च्या सुमारास  विसापूर किल्लेच्या पायथ्याला पोचलो. तिथे रहात असलेल्या आणि छोटेखानी खानावळ चालवणाऱ्या कुटुंबाला एखादा गाईड मिळतो का ते विचारलं. गाईड मिळेल पण किल्ल्याची पूर्ण माहिती इतिहास संशोधकांना देखील नसेल अशा उत्तराने जरा नाखूष होतच आम्ही गाईड चा निर्णय रद्द केला आणि निघालो.

पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली अशी वाट, मोठाले खडक ओलांडत प्रवास सुरू होता. इथेही झाडावरील माकडांनी आमचे स्वागत केले ! पुढे निघालो ....

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग तसा लवकर पार झाला..वाटत होतं की हा एक लहान प्रकारात ट्रेक होईल. वरती पोचलो आणि एक विस्तीर्ण पठार दिसलं. अरे बाप रे, लोहगड ज्याच्या सामर्थ्यावर उभा होता आणि आहे तोच हा विसापूर!  इथली मजबूत तटबंदी आजही स्वराज्याच्या प्रचंड ताकदीची ग्वाही देते.
थोड पुढे चालून गेल्यावर थोडी वनराई होती आणि त्यातून पुढे जाताना काही जुने महाल सदृश अवशेष आढळले. तिथेच काहीश्या झाडांच्या सावलीमध्ये एका अवलिया चित्रकाराचे दर्शन झाले! विवेक काळे असं त्यांचं नाव.

निसर्गात तासनतास बसून निसर्गाचं हुबेहूब चित्र रेखाटन हा त्यांचा खूपच निगुतीने जोपासलेला छंद ! पिंपरी चिंचवड च्या औद्यगिक नगरीत राहून आणि काम करत असून देखील हा असा छंद जोपासत रहाणं म्हणजे एक अजब साधना ! त्यांच्याशी बोलून त्यांचे अभिवादन घेत पुढे महादेव मंदिराकडे वाटचाल सुरू होतो.

महादेव मंदिर फारच सूरेख आहे. तिथे नियमाप्रमाणे नारळ वाढवून आणि पुष्पहार अर्पण करून निघालो. इथे मुख्य मंदिरासमोर एक छोटासा मनोरा आणि त्यावर गणपती बाप्पा देखील आहे. पूर्वी खुप मोठे मंदिर असावे असे वाटते

पठार पूर्ण करूनच यायचे हा सर्वांचाच दृढनिश्चय होता. वाटेत अर्थात प्रशांत अत्यंत शांतपणे इतिहासातील काही पाने आमच्या समोर उलगडून प्रसंग उभा करत होता. ह्या पठारावर एका बाजूला असलेली तटबंदी संपूर्ण किल्ला किती मजबूत असेल याची साक्ष देत होता.

समोरच भगवा ध्वज नेहमीप्रमाणेच दिमाखाने फडकत होता..अगदी दृष्टिपथात असलेला लोहगड पावलं थांबुच देत नव्हता.

शारीरिक क्षमतांचा विस्तार होतोय आणि मानसिक दृष्टया देखील आपण सक्षम होत आहोत ह्याची परिपूर्ण जाणीव करून दिली विसापूर ने !

आपल्याला दुरून कितीही छोटा असल्याचा अंदाज फसवा असून ..प्रत्यक्ष भव्यता अनुभवण्याची तयारी ठेवली पाहिजे हे आज आम्ही शिकलो.

चालत रहा 🏃

लेखन - गणेश कुलकर्णी

टीम - गणेश कुलकर्णी, प्रशांत सकळे, संदीप सुट्टी, प्रवीण पाटील, देवेंद्र पाचोरे 

मन सक्षम - मजबूत बनवणारा किल्ले विसापूर | Visapur Fort Trekking Blog | चालत रहा मन सक्षम - मजबूत बनवणारा किल्ले विसापूर | Visapur Fort Trekking Blog | चालत रहा Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, February 25, 2024 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.