सदाशिवगडचा ट्रेक करून आम्ही सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान आम्ही वसंत गडाकडे निघालो. सदाशिव गडावरील चांगदेव काळातील महादेव दर्शनाने, गडावरील मारुती दर्शनाने, गडावरील भोई नावाचे पुजारी यांच्या सिद्ध वाणीने व अनुभवलेल्या दैवी चमत्कारान, भक्तीभावाने मी अक्षरशः भारावून गेलो होतो. आपण निमित्त मात्र असून, आपल्याला येथे महाराजांनी कशासाठी बोलवलेले याचा मी मनातल्या मनात उलघडा करत तळबीड गावाच्या पायथ्याशी पोहोचलो.
गावात गेल्यानंतर सुरुवातीलाच दिसते ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी. दर्शन घेताना अंगावरती काटा उभा राहतो व अंगात स्फुरण चढते. गावातील गल्लीबोळातून गाडी चालवत आम्ही वसंत गडाच्या पायथ्याशी असलेल्या शाळेजवळ पोहोचलो. गाडी पार्क केली. थोडासा हलका नाश्ता म्हणून दिवाळीचा फराळ खाल्ला. आणि गडाच्या दिशेने निघालो.
पुणे बेंगलोर महामार्गावर ती कराडच्या जवळ हायवे वरून जाताना हा किल्ला दृष्टीस पडतो. तळबीड गावाच्या परिसरातील संरक्षण करण्याकरता हा किल्ला होता. सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या कन्या महाराणी ताराबाई या तळबीडच्या होत्या.
गड चढण्यात सुरुवात केली असता, सुरुवातीच्या काही पायऱ्यांवर नारळ फुले व तुपाच्या वाती लावलेल्या दिसल्या. मी थोडं आश्चर्यचकित झालो. गडाच्या खाली का बरं नारळ फुले वाहिलेली असतील?
मी, किरण, सागर व अभय आम्ही चौघे मागेपुढे करत गडाच्या दिशेने निघालो. गडावर झाडे हिरवळ भरपूर प्रमाणात आहे. खालून गडाकडे पाहिल्यानंतर गडाची तटबंदी स्पष्टपणे दिसत होती. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाका चांगलाच जाणवत होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर कोल्हापूरहून आलेली एक मोठी फॅमिली दिसली. त्यातील एक वयस्कर आजीबाई घर चढताना थोड्याशा घाबरलेल्या वाटल्या. त्यांना जमेल की नाही अशी शंका येत होती. आम्ही त्यांना धीर दिला आणि हळूहळू येण्यास सांगितले काही मदत लागण्यास आम्हाला हाक मारा. आम्ही तुमच्या पुढेच आहोत.
सागर आमची पाण्याची बॉटल घेऊन सर्वात पुढे निघून गेला होता. इकडे अभय आणि मला मात्र प्रचंड तहान लागली होती. झाडाखाली सावलीला बसत बसत पाऊण तासानंतर आम्ही गडाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो.
प्रवेशद्वारावरच एका गुंठेत गणपतीची सुंदर मूर्ती आहे. तिथेच पायरी वरती सागर बसलेला दिसला. सर्वात प्रथम पाण्याची बॉटल घेऊन आम्ही आमची तहान भागवली. चौघांनी 15 ते 20 मिनिटं विश्रांती घेतली. सोबतीला थोडा दिवाळीचा फराळ होताच.
थोड्याश्या विश्रांतीनंतर आम्ही गड पहायला सुरुवात केली. गडावरील चारी बाजूची तटबंदी दररोज हे चांगल्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी बुरुजांची काळाच्या ओघात पडझड झालेली आहे. गडावरती राजवाड्यांचे अवशेष सुद्धा आहेत.
गडावरून आपल्याला पाटणकडचा भाग कराडचा भाग आणि इकडे सातारचा भाग पाहता येतो. यावरून गडाचे भौगोलिक महत्व आपल्याला समजून येते. गडावरती अनेक समाध्या, सती शिळा व दोन तळे आहेत. हे सर्व पहात आम्ही एका मंदिराजवळ पोहोचलो. संपूर्ण ट्रेक मध्ये आम्हाला या मंदिराविषयी काहीही कल्पना नव्हती.
मंदिरासमोर एक छोटे कुटुंब जेवण करत बसले होते. तिथेच जवळ मंदिरातील पुजारी सुद्धा होते. सर्वात पहिला मला प्रश्न पडला की, गडावरती हे कोणतं मंदिर आहे की जिथे संपूर्ण परिवार दर्शनासाठी येत आहे ? कारण गडावरती चढताना मला तीन चार फॅमिली येताना दिसल्या होत्या.
उत्सुकतेपोटी आम्ही देवाचे दर्शन घेण्याऐवजी देवळातील पुजाराबरोबर चर्चा करत बसलो. त्यानंतर समजलं की हे चंद्रसेन महाराज यांचे मंदिर आहे. याचा संबंध थेट रामायणाशी आहे असे सांगितले जाते. श्रीराम वनवासात असताना काही काळ या तळबीड परिसरात होते. त्यावेळी लक्ष्मणाच्या हातून खडक शस्त्र नजरचुकीने गडावरील वनराईत तपश्चर्येला बसलेल्या चंद्रसेनला लागले. आणि त्याची दोन्ही हात कोपरापासून तुटले. चंद्रसेन हे भगवान महादेवाचे अवतार होते. हात तुटलेल्या परिस्थितीतही त्यांनी तपश्चर्या पूर्ण केली. रामाने तुझी कुलदैवत म्हणून पूजा केली जाईल असा वर दिला. आज ही गडावरील आणि गडाच्या आसपासच्या कुटुंबांचे कुलदैवत हे चंद्रसेन आहेत. आज ही महाराष्ट्रातील घरंदाज मराठी घराणे चंद्रसेनला आपले कुलदैवत मानतात. तळबीड मध्ये रामाचे जागृत देवस्थान सुद्धा आहे.
चर्चा झाल्यानंतर आम्ही आत दर्शनासाठी गेलो. चंद्रसेन देवाची मूर्ती पहिली. खरंच त्यांचे दोन्ही हात कोपरापासून तुटलेले दिसले. आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही मंदिरात नारळ वाढवला. गडावरती देव दिवाळी साजरी केली. खरंच मन प्रसन्न झालं. आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की कोणत्या तर गडावर येऊन दिवाळीचा फराळ करीन आणि दिवाळी साजरी करीन आणि तेही कुलदैवत असलेल्या चंद्रसेन देवाच्या मंदिरात.
जवळपास तासाभराने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. इतक्यात मंदिराजवळ येताना त्या आजीबाई दिसल्या. ज्या मला गड चढताना भेटल्या होत्या. मी म्हणालो काय आजीबाई पोहोचला ना गडावरती आरामात. आजीबाई माझ्याकडे पाहून हसली. लेका गड चढताना तू दिलेल्या धर्य रुपी शब्दामुळे मला आज पहिल्यांदा माझ्या कुलदैवाच दर्शन होतं आहे. लेका तु बोलला आणि माझ्यात ताकत आली बघ. तू बोलला म्हूणन मी इथं पर्यतं आले. असं बोलून त्यांनी मला हात जोडला आणि माझ्या पाया पर्यंत नेला. मला काहीच सुचलं नाही. मी बोललो असं काही नसतं असं बोलून मीही पाया पडलो.
आपण सहज बोलून गेलेलो शब्द ऐखादयासाठी इतके प्रेरणादायी असू शकतात हे वसंतगडाने शिकवलं.
गडावरून खाली उतरताना आम्ही सर्वजण मस्त मजा करत आलो. गडाच्या पायथ्याला आजून ही लोकांनी चंद्रसेन देवाच्या नावाने लावलेल्या तुपाच्या वाती जळत होत्या. मागे वळून मी गडाला डोळे झाकून नमस्कार केला.
आता मात्र मला आसमंतात चंद्रसेन, राम, माझे महाराज आणि ती आजी दिसायला लागली आणि पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये भक्तीची भावाची दिवाळी साजरी झाली. 🙏
चालतरहा 🏃🏃
वसंतगडावरील दिवाळी
Reviewed by Vaibhav Kavade
on
Saturday, March 09, 2024
Rating:
No comments: